आदिवासी सेवा मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद -चेतनकुमार तेलगावकर
सावदा- आदिवासी सेवा मंडळातर्फे रविवारी शहरात झालेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 42 जोडपी विवाह बंधनात अडकली. या सोहळ्यात आदिवासी तडवी समाजाची 32 तर ख्रिश्चन व हिंदू समाजाची तीन तसेच चार निधर्मी (कोणत्याही धर्माला न मानणार्या) जोडप्यांचे शुभमंगल झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे सहा.धर्मदाय आयुक्त चेतनकुमार तेलगावकर होते. ते म्हणाले की, आसेमने आतापर्यंत एक हजार 700 जोडप्यांचा सामूहिक मेळाव्यात विवाह लावण्याची बाब राज्यातच नव्हे तर देशात एक विक्रम ठरू शकते. या उपक्रमासाठी नेहमीच लागेल ती मदत द्यायला आपण तयार असून हा उपक्रम निरंतर सुरू रहावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, आदिवासी बांधवांचा आदर्श इतर समाजाने समोर ठेवावा. सातत्याने 23 वर्ष येथे सामूहिक विवाह लागत आहे याचे सर्व श्रेय आसेम व त्यांच्या कार्यकर्त्यांना जाते, असे ते म्हणाले. शरद महाजन, सहायक धर्मदाय अधिकारी मनीषा डवले, जिल्हा सेल टॅक्स अधिकारी एन.ए.तडवी, मीना तडवी, मासूम रहेमान तडवी, आशा रफिक तडवी (नाशिक)नगरसेविका विजया जावळे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, नगरसेविका नंदाबाई लोखंडे, सावद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे, रमजान रसूल तडवी, रशीद तडवी, आसेमचे संस्थापक अध्यक्ष राजू तडवी (गुरुजी) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आसेमचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते तथा आदिवासी तडवी समाज बांधव, राष्ट्रीय एकात्मता मंचने परीश्रम घेतले.