सावद्यात सेना-भाजपाचे नगरपरीषदेत ठाण्यात ठिय्या आंदोलन
स्वच्छतागृहावर भावना दुखावणारे चित्र ः सावदा मुख्याधिकार्यांसह दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
सावदा : सावदा पालिकेच्या मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह संबंधिता दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी शहरातील शिवसेना व भाजपा पदाधिकार्यांनी नगरपरीषदेत ठिय्या आंदोलन करीत संताप व्यक्त केला. सावद्यातील प्रभाग क्रमांक सातच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर हिंदू धर्मियांचा भावना दुखावणारे चित्र रेखाटण्यात आल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात आले. दोन्ही पक्षातर्फे सावदा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
डफ वाजवून आंदोलन
सोमवार, 7 रोजी सावदा पालिकेसमोर सकाळी 11 वाजेपासून डफ वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी हे या प्रकरणास जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुख्याधिकारी हे कामानिमित्त बाहेर गावी असल्याने प्रशासक प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी स्वतः येऊन याप्रकरणी चौकशी करू व त्यानंतर या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले. या प्रकरणाची चौकशी तीन दिवसात करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. तीन दिवसात चौकशी होऊन कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलना चा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, भरत नेहेते, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, मिलिंद पाटील, गौरव भंगाळे, भाऊ धांडे, स्वप्नील पवार, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, गजानन भार्गव, संतोष परदेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सध्याचे राज्याचे राजकारणात शिवसेना व भाजपा यांच्यात विस्तव जात नसला तरी सावदा येथे दोन्ही पक्ष या विषयावर एकत्र आलेले दिसले.