सावदा- पालिका सभागृहात मंगळवारी सभागृहात आयोजित विशेष गतसभेत स्थगित झालेला हिंदू दफनभूमी विषयाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले होत्या. नगराध्यक्षा येवले यांनी गतवेळच्या सभेतील शहरातील अत्यंत महत्वपूर्ण असा हिंदू लोकांसाठी दफनभूमीच्या विषययावर सभा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. सत्ताधारी गटाच्या नगरसेविका रंजना भारंबे यांनी पालिकेच्या मालकीची गट क्रमांक आठमधील 2.32 आर जागे पैकी सध्या मोकळी असलेली सुमारे एक हेक्टर जागा सदर हिंदू दफनभूमीसाठी देण्यात यावी, अशी भूमिका मांडली यास सत्ताधारी गटाच्या सर्व नगरसेवकांनी पाठींबा दर्शविला.
गटनेत्यांच्या अर्जामुळे काही वेळ शाब्दीक वाद
राष्ट्रवादीचे गटनेते फिरोजखान पठाण यांनी याचबाबतीत सुनी जामा ट्रस्टचा अर्ज आला असूनतो देखील वाचावा, असे सुचविले. यावेळी हा अर्ज वाचण्यात आला. ही जागा एका समाजाच्या दफनभूमीजवळ असून त्याच शेजारी दुसर्या समाजास जागा दिल्यास भविष्यात वाद निर्माण होऊ शकतो तसेच या जागेवर इतर नावाने पेरे आहेत, असे सांगत ही जागा देण्यात येऊ नये, असे सांगितले. सोबत नगरसेवक फिरोज खान यांनी सदर जागेबाबत वक्फ बोर्ड, औरंगाबाद येथे दावा सुरू असल्याचे सांगत सदर जागा देता येणार नाही, असे सुचविले. यानंतर काही वेळ नगरसेवक फिरोजखान व नगरसेविका रंजना भारंबे यांच्यात शाब्दिक वाद झाले. सत्ताधारी नगरसेवक विश्वास चौधरी तसेच अजय भारंबे यांनीदेखील ठराव करण्याचे सांगत शहरात हिंदू लोकांचे अनेक पंथांमध्ये मृत प्रेत हे दफन केले जाते मात्र त्यांना जागा नसल्याने त्यांना कोठेही किंवा नाल्याकाठी दफन करावे लागत असल्याने मृतदेहाची अवहेलना होते इतर, समाजासाठी दफनभूमी आहेत फक्त हिंदू समाजासाठी जागा का नाही? असा प्रश्न मांडत ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. शेवटी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला. मुख्याधिकारी सौरभ जोशी, उपनगराध्यक्षा सागीराबी सय्यद तुकडू, नगरसेविका रंजना भारंबे, लीना चौधरी, जयश्री नेहेते, करुणा पाटील, शबाना तडवी, नंदाबाई लोखंडे, विजया जावळे, नाजेराबी बागवान, नगरसेवक विश्वास चौधरी, अजय भारंबे, राजेश वानखेडे, सिद्धार्थ बडगे, फिरोजखान पठाण आदी उपस्थित होते.