सावद्यासह यावलमधील 43 जुगारी जाळ्यात

0

सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची धडाकेबाज कारवाई

भुसावळ ः यावलसह सावदा येथे राजरोस चालणार्‍या जुगार अड्ड्यावर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री अचानक धाड टाकत 43 जुगारांच्या मुसक्या आवळल्या. दुचाकींसह हजारो रुपयांची रोकड व मोबाईल आदी मिळून लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आल्याने जुगार्‍यांचे धाबे दणाणले आहे. जळगाव पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर ही धाड टाकण्यात आली.

यावलमधील 19 जुगारी जाळ्यात

यावल शहरातील सुदर्शन टॉकीजसमोरील एका घरातून 19 जुगारींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. येथून सट्टा व जुगारांच्या साधनांसह 19 हजार 480 रुपयांची रोकड, 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून एक लाख 14 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सावद्यातील 24 जुगारी जाळ्यात

सावदा शहरातील बर्‍हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील कन्हैय्या हॉटेल मागील परीसरातून 24 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 25 हजार 430 रुपयांची रोकड, 24 हजार 600 रुपये किंमतीचे मोबाईल व एक लाख 20 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी मिळून एक लाख 70 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अत्यंत गोपनीय कारवाई

सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, चोपड्याचे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक धनंजय पाटील तसेच चोपडा, भुसावळ बाजारपेठ, शहर, नशिराबाद व आरसीपी प्लाटूनच्या पोलिसांना चार खाजगी वाहनांद्वारे नेत अत्यंत गोपनीय पद्धत्तीने कारवाई करण्यात आल्याने जुगार्‍यांना पसार होणे अशक्य झाले. या कारवाईत भुसावळचे उपनिरीक्षक मनोज ठाकरे, उपनिरीक्षक युवराज अहिरे, एएसआय दिलीप कोळी, श्रीकांत ठाकूर, संदीप चव्हाण, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, अय्याज, संदेश निकम, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, विनोद वीतकर, विशाल मोहे, मोहन पाटील, वासुदेव मराठे, गुलाब माळी आदी या कारवाईत सहभागी झाले.