सावधान! फोफावतोय ‘सायबर स्टॉकर्स’!

0

‘ऑनलाइन स्टॉकिंग’ होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा स्टॉकर्सचा तत्काळ बंदोबस्त करणे गरजेचे असते. हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, एकतर्फी प्रेमातून होणारा छळ अशा अनेक पद्धतींच्या हिंसाचाराला महिलांना पूर्वीपासूनच सामोरे जावे लागत होते. आता तंत्रज्ञानाचे युग आहे. मात्र हा छळ काही थांबता थांबत नाही. काळानुसार फक्त त्याचे स्वरुप बदलले आहे. तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली खरी. परंतु, या तंत्रज्ञानाचा गैरवापरही वाढला. महिलेच्या किंवा एखाद्या व्यक्तिच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून ही मंडळी ‘सायबर स्टॉकिंग’ करत असतात.

‘सायबर स्टॉकिंग’ म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून एखाद्या पीडित व्यक्तिला नाहक त्रास देणे. यामध्ये फोन कॉल्स करणे, व्यक्तिची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या वस्तूवर घाणेरडे संदेश किंवा वाक्य लिहिणे अशी अनेक कृष्णकृत्य केली जातात. अनेकदा काय होते या प्रकारामधील गुन्हेगार हा प्रेमभंग झालेला, एकतर्फी प्रेम करणारा असतो, तर काही वेळा अपमानित व्यक्ती सूड घेण्याच्या भावनेनेही अशी कृती करत असते. यामध्ये पीडित व्यक्तीची संपूर्ण वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती, फोन नंबर आणि पीडित व्यक्तिची दैनंदिनी या सर्वांची माहिती जमा करून त्या माहितीच्या आधारे पीडित व्यक्तिला इजा पोहोचवली जाते. ही वैयक्तिक माहिती इंटरनेटच्या सेक्स सर्व्हिस किंवा डेटिंग सर्व्हिसच्या वेबसाइटवरही पोस्ट केल्याचे अनेक प्रकारही घडलेले आहे. म्हणतात ना, जितकी सुबत्ता येते, तितक्या गरजा वाढतात. तंत्रज्ञानाचेही तसेच आहे. तंत्रज्ञानाने जसजशी प्रगती केली तसतसा त्याचा गैरवापरही वाढला. आता इथे गरज निर्माण झाली ती या उपद्रवीपणाला आळा घालण्याची… बरोबर ना? होय. याबाबतीत आता सावधान म्हणण्याची वेळ आली आहे. कारण ‘सायबर स्टॉकर्स मोठ्या प्रमाणात फोफावतोय!

‘सायबर स्टॉकिंग’मध्ये एखाद्या व्यक्तिची छायाचित्रे किंवा व्हिडीओ मिळवून ते पोर्नोग्राफी साइट्सवर वापरले जातात. आयटी अ‍ॅक्ट 2000 हा सायबर गुन्ह्यांसाठी बनवलेला अत्यंत कडक कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यांन्वये ‘सायबर स्टॉकर’ला कठोर शिक्षा होऊ शकते. गुन्हा सिद्ध झाल्यास 10 वर्षे तुरुंगवास व मोठा दंड होऊ शकतो. मात्र जर ‘स्टॉकर’ हा परदेशातील असेल तर त्याला आपल्या कायद्यांतर्गत आपण काहीच प्रतिबंध करू शकत नाही. त्यामुळे इंटरनेटवर सक्रिय राहताना महिलांनी खूप जागृत राहणे गरजेचे आहे.

पीडित व्यक्तीची बदनामी होईल, अशा प्रकारचा मजकूर ई-मेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे याला ‘सायबर डिफेमेशन’ असे म्हटले जाते. तर पीडित व्यक्तींच्या छायाचित्रांमध्ये बदल करून त्यांना अश्‍लील रूप देणे व अशी खोटी छायाचित्रे विविध माध्यमांतून प्रसारित करणे याला मॉर्फिग म्हटले जाते. अशा प्रकारे ‘सायबर स्टॉकर्स’ मुली/महिलांना नाहक बदनाम करतात. वेगवेगळ्याप्रकारे त्रासही देत असतात. सायबर स्टॉकर्सवर वचक ठेवण्यासाठी प्रत्येक मोठ्या शहरात पोलिसांचे विशेष सायबर क्राइम सेल आहेत. जिथे तक्रार नोंदवल्यावर या स्टॉकर्सच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून त्यांचा पत्ता शोधून काढला जातो व त्यांचा त्रास कायमचा बंद होऊ शकतो. तरीही सायबर स्टॉकरकडून दिला जाणारा त्रास बंद करण्याकरिता इंटरनेटवरील सुरक्षा नियमांचे पालन करणे केव्हाही उत्तम. या सुरक्षा उपायांमुळे संबंधित ‘स्टॉकर’ला ‘ब्लॉक’ करणे किंवा त्याच्याबद्दल इंटरनेट यंत्रणेकडे ‘रिपोर्ट’ करणे, हे उपाय अगदी घरबसल्याही करता येतात. हे प्रकार करूनही ‘स्टॉकर’ थांबत नसेल तर त्याची पोलिसांकडे तक्रार करायला हवी.

‘सायबर स्टॉकर्स’ अर्थात ‘ऑनलाईन’ छळासोबत अनेक सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर सुरक्षेसाठीच्या उपायांमध्ये वारंवार सुधारणा होत असल्या तरी, सायबर गुन्हेगार या सुधारणांना बगल देत वा त्या मोडून काढत सर्वसामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतातच. 2 वर्षांपूर्वी ‘क्रायडेक्स’ नावाच्या अशाच एका व्हायरसने विविध बँका व सोशल नेटवर्किंग साइटवर हल्ल केला. ई-बँकिंगची माहिती चोरणारा हा ‘ट्रॉजन’ अगदी पेन ड्राइव्हद्वारेही व्हायरल होत होता. या माध्यमातून तो वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरून हॅकर्सपर्यंत पोहोचवत होता. जून महिन्यात अनेक देशांमध्ये ‘वॉन्नाक्राय रॅन्समवेअर व्हायरस’ने खळबळ उडवून दिली होती. सरकारी, खासगी कंपन्या, बँका, रुग्णालये, बंदरे यांना लक्ष्य करत या ‘व्हायरस’च्या निर्मात्यांनी सर्व काही पूर्ववत करण्यासाठी चक्क खंडणी वसूल केली. मुळात रॅन्समवेअर व्हायरस हा खंडणीसाठीच तयार करण्यात आला होता. संगणकतज्ज्ञांच्या दक्षतेमुळे भारतात हा व्हायरस जास्त पसरू शकला नाही. मात्र या व्हायरसचे निर्माते सायबर हल्लेखोर पुन्हा एकदा हल्ला घडवू शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हल्लीच्या इंटरनेट युगात बँकिंग प्रक्रिया अतिशय सुलभ व जलद झाली आहे. आपल्याला हव्या त्या ठिकाणाहून पैसे काढता येतात. नेटबँकिंगच्या मदतीने घरबसल्या बँकेचे व्यवहार करता येतात. या सुविधेमुळे ‘इंटरनेट बँकिंग’च्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोटबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला अन् ‘ऑनलाईन’ व्यवहारांना चालना मिळाली. अगदी मोबाइलची बिले भरण्यापासून मित्राला पैसे पाठवण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी आपण या माध्यमातून करतो. मात्र त्याच वेळी वापरकर्त्यांचा थोडासा निष्काळजीपणा सायबर चोरांच्या पथ्यावर पडू शकतो. ‘हॅकिंग’च्या माध्यमातून संबंधित वापरकर्त्यांची आर्थिक लूटही केली जाते. भारतात ‘सीईआरटी’ अर्थात इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही एजन्सी ‘हॅकिंग’, ‘फिशिंग’ यांसारख्या प्रकारांना आळा घालण्याचे काम करते.

सायबर सुरक्षेसाठी भारतीय संगणक आणीबाणी प्रतिसाद पथकाने मलेशियातील सायबर सिक्युरिटी संस्था, सिंगापूरमधील ‘सिंगापूर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सिंग-सीईआरटी) आणि जपानमधील ‘जपान कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम को ऑर्डिनेशन सेंटर’शी करार केला आहे. या माध्यमातून सर्व संबंधित संस्था संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करून परस्परांच्या देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी किंवा अशी फसवणूक करणार्‍या सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी मदत करत असतात. याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये गतवर्षीच्या संयुक्त चर्चेतही सायबर सुरक्षेबाबतचा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला होता. या झाल्या शासकीय पातळीवरील उपाययोजना. मात्र खासगी पातळीवरही ठोस उपाययोजना व्हायला हव्यात. जेणेकरून नागरिकांची फसवणूक व छळ थांबायला मदत होईल.

हॅकर्सपासून बचावासाठी उपाययोजना
आर्थिक व्यवहार करण्यासाठी संस्था अथवा बँका त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा इंटरनेटवरचा पत्ता पाठवतात. तो पत्ता या शब्दाने चालू होत नसेल तर अजिबात व्यवहार करू नका. या शब्दाने चालू होणारी सर्वच संकेतस्थळे सुरक्षित नसतात. अशा संकेतस्थळांवरील आपली माहिती कोणीही चोरू शकते.

चॅटिंग करताना आर्थिक वा व्यक्तिगत सुरक्षिततेबाबतची कोणतीही माहिती ‘शेअर’ करू नये. त्या माध्यमातूनही ही माहिती सायबर चोरांपर्यंत पोहोचू शकते.

ऑनलाइन व्हिडीओ चॅटिंग करत असताना मायक्रोफोन व वेबकॅम बंद झाल्याची खात्री करून घ्यावी. एरवी मात्र ते झाकून ठेवा.

बहुतांश गुन्हे पासवर्ड आणि लॉगइन माहिती चोरून केले जातात. आपल्या नकळत ही माहिती आपल्या संगणकातून चोरली जाऊ शकते. त्यामुळे नियमितपणे आपले पासवर्ड बदलत राहा. अनेक बँका दर दोन आठवड्यांनी नेटबँकिंगचा पासवर्ड बदलण्याची सूचना देत असतात. बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हा दुर्लक्षीतपणा सायबर हल्लेखोरांच्या पथ्यावर पडल्यास मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते.

अनोळखी ईमेल, पायरेटेड सॉफ्टवेअर, गेम डाऊनलोड करू नका. या फाइलमधून एखादा स्पायवेअर संगणकात शिरकाव करू शकतो.

दोर-दोन दिवसांनी संगणकावरील ‘टेंपररी फाइल्स’ डिलीट कराव्यात. जुनी ‘वेबपेजेस’ही नियमितपणे हटवावीत. वेळोवेळी हिस्टरी डिलीट करावी.

संगणकात चांगला अ‍ॅण्टिव्हायरस आवश्यक आहे. त्यासोबतच तो वेळोवेळी अपडेट होतोय का, याचीही खातरजमा करून घ्या. या अ‍ॅण्टिव्हायरसच्या साह्याने अधूनमधून संगणक ‘स्कॅन’ करावा.

पेनड्राईव्ह किंवा अन्य कोणतेही ‘रिमूव्हेबल स्टोअरेज’ जोडताना ते स्कॅन करून घ्या.

ईकॉमर्स संकेतस्थळांचा वापर नियंत्रित करा. सोशल मीडियावरून प्रसारित केल्या जाणार्‍या जाहिरातींच्या लिंकवर ‘क्लिक’ करू नये.
सुनील आढाव – 7767012211