पुणे : वर्ष 2017च्या पहिल्या सहामाहीत विधवा, परितक्त्या व विवाहच्छूक कुमारीकांच्या फसवणुकींच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांतच तब्बल 54 केसेस विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. या तरुणींची केवळ शारीरिक, लैंगिक किंवा मानसिकच फसवणूक झाली नाही तर त्यांची आर्थिक फसवणूकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. विवाहच्छुकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या विविध मॅट्रीमनी साईटस् या फसवणुकीच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. बोगस प्रोफाईल तयार करून, या साईटवर नोंदणीकृत तरुणींना जाळ्यात ओढून फसविण्याचा भामट्यांनी जोरदार गोरखधंदाच सुरु केला असून, यापैकी काही भामटे अद्यापही पोलिसांच्या नजरेपासून दूर आहेत.
गतवर्षीचे रेकॉर्ड यंदा मोडले!
‘एनआरआय मेन लूकिंग फॉर ब्राईड’च्या जाहिरातींना पुण्यातील उच्चशिक्षित, सुस्थापित तरुणी मोठ्या प्रमाणात फसत असल्याचे प्राकर्षाने जाणवत आहे. एकवेळ या साईटच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क झाला की, हे भामटे त्यांचा विश्वास संपादीत करतात. त्यांना काही भेटवस्तूही पाठवतात. या भेटवस्तू कस्टममध्ये सापडल्याचे कारण सांगून, त्यांना ऑनलाईन पैसे भरण्यास सांगतात. एकदा पैसे मिळाले की ते लगेच बेपत्ता होऊन जातात. काही भामटे तर पुण्यात येऊन या तरुणींची भेट घेऊन, त्यांच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित करतात. ठरावीक कालावधीत विविधप्रकारे त्यांची शारीरिक, लैंगिक व आर्थिक लूट करून ते पोबारा करतात. अशा प्रकारच्या तब्बल 54 केसेस अवघ्या सहा महिन्यांत दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या 82 टक्क्यांनी जास्त असल्याचेही पोलिसांनी सांगितले. काही प्रकरणात तरुणींनीही लग्नाच्या आमिषाने सुशिक्षीत तरुणांना फसविले व लुबाडले असल्याचेही पोलिस म्हणालेत.
अशी आहे भामट्यांची गुन्हे करण्याची पद्धत..
पोलिसांच्या सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भामटे सोशल मीडियावर आपले बनावट अकाउंट तयार करतात. तसेच, मॅट्रीमनी साईटसवरही असेच अकाउंट उघडलेले असते. हे अकाउंट खरे वाटण्यासाठी त्यापोटीचे रितसर शुल्कही हे भामटे भरत असतात. उच्चशिक्षित महिला, ज्या एकट्या राहतात आणि त्या घटस्फोटीत, विधवा आहेत त्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम हे भामटे करत असतात. आर्थिक संपन्न, एखाद्या कंपनीत काम करणार्या या तरुणींशी संपर्क साधून हे भामटे त्यांचा विश्वास संपादन करतात. काहीप्रसंगी त्यांना वारंवार भेटतातही. किंवा आपण विदेशात असल्याचे सांगून, ते त्यांच्याशी वारंवार ऑनलाईन संवाददेखील साधत असतात. लवकरच भारतात येत आहे, अशा सबबीखाली ते काही पैसे उकळण्याचाही प्रयत्न करतात. किंवा, आपण भारतात आलो आहोत; परंतु आपले पैसे व बॅग चोरीला गेल्याची सबब सांगून ते काही पैसे तातडीने ऑनलाईन पाठविण्यास सांगतात. एकदा पैसे मिळाले की ते संपर्क तोडून टाकतात, अशी गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीची माहितीही पोलिसांनी दिली.