केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर लागलीच देशातील बुद्धिवादी वर्गातून कथित असहिष्णूतेविरूद्ध सूर उमटला होता. यावर प्रचंड वादही झाले होते. आज मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असतांना असहिष्णूतेचा मुद्दा मागे पडला असून अन्र प्रकारातून कट्टरपंथी विचारधारा प्रबळ बनत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. यातील पहिली घटना कर्नाटकात समोर आली. यात सुहाना सय्यद या मुस्लीम गायिकेने एका ‘रिअॅलिटी शो’मध्ये जाहीररित्या भजन म्हटल्याने कट्टरपंथियांचे पित्त खवळले. यामुळे तिच्यावर सोशल मीडियातून चिखलफेक करण्यात आली. तिला धमकावण्यात आले. आपल्या धर्मात गायन, वादनासारख्या कला त्याज्य असतांना या तरुणीने तर चक्क हिंदू देवतांचे स्तुतीगान करणारे भजन म्हटल्याने तिला ‘ट्रोलिंग’ला सामोरे जावे लागले. तिला धार्मिक नीती-नियम शिकवण्यात आले. याचसोबत तिला धमकावण्याचे प्रकारदेखील झालेत. यातील विरोधाभास आपण समजून घेतला पाहिजे. हिंदीच नव्हे तर देशातील सर्व भाषांमध्ये मुस्लीम गायक-गायिकांनी असंख्य भजने म्हटली आहेत. याच धर्माच्या गितकारांनी याला शब्द तर संगीतकारांनी साज दिला आहे. अगदी आजही हे अव्याहतपणे सुरू आहे. मात्र, एखाद्या नवोदित गायिकेच्या भजनामुळे कुणाच्या धार्मिक भावना कशा दुखावू शकतात? हा प्रश्न आता प्रत्येक सुजाण नागरिकाला अंतर्मुख करणारा आहे. याचप्रमाणे देशाच्या दुसर्या टोकावर असणार्या आसामातील एका प्रकरणानेही खळबळ उडविले आहे. तेथेही मुद्दा एका गायिकेचाच आहे.
आसामातील नाहीद आफरीन या किशोरीचे गायन सध्या वादाच्या भोवर्यात सापडले आहे. दहावीत शिकणारी नाहीद ही बालिका गत वर्षीच्या ‘इंडियन आयडॉल’ या स्पर्धेतील उपविजेती आहे. तिचा स्थानिक महाविद्यालयात 25 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही कट्टरपंथियांना रूचला नाही. परिणामी, परिसरातील 46 मौलवींनी या नियोजित कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्रक जारी केले. खरं तर चुकीने पहिल्यांदा या प्रकाराला फतवा म्हणण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे इशारा देणारे पत्रक आहे. मात्र, यातही गायन हे धर्मद्रोही असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्थात कर्नाटकाप्रमाणेच आसाममध्येही गायनावरून मूलतत्ववाद्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे. बरं हा प्रकार फक्त मुस्लीम धर्मातच आहे, असे नव्हे. याचे एक भयंकर आणि दुसर्या पद्धतीचे उदाहरण उत्तर प्रदेशातल्या बरेलीसह अन्य भागांमध्ये दिसून आले आहे. या भागातील अनेक गावांमध्ये आता युपीत भाजपची सत्ता आल्यामुळे मुस्लीम धर्मियांनी हा भाग सोडावा, असा इशारा देण्यात आला आहे. ज्या पद्धतीने कर्नाटक आणि आसाममधील तरुणींचे गायन कट्टरपंथियांना झोंबले. अगदी त्याच पद्धतीने आता भाजपच्या विधानसभेतील विजयाला धार्मिक आयाम देत मुस्लिमांना धमकावण्याचे काम सुरू झाल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.
मुजफ्फरपूर दंग्यांपासून उत्तर प्रदेशात हिंदू व मुस्लीम समुदायातील तणाव वाढीस लागला आहे. खरं तर कधी काळी या दोन्ही धर्मांच्या एकतेचे प्रतिक म्हणून रुपीतल्राच ‘गंगा-जमुनी’ संस्कृतीचे उदाहरण दिले जात होते. मात्र, याच प्रदेशातून आता हिंदू, मुस्लीम समुदारांमधून वैमनस्याचे सूर उमटू लागल्याची बाब अतिशय गंभीर आहे. मध्यंतरी युपीतल्या काही भागांमधून हिंदू समाज स्थलांतर करीत असल्याची आवई उठली होती. यावरूनही वाद झाले होते. प्रत्यक्षात मात्र असे काहीही झाले नसल्याचे आढळून आले होते. मुजफ्फरपूर दंगे, मोहंमद अखलाकची हत्या आदी बाबींनी उत्तर प्रदेशच्या राजकारणाला धार्मिक ध्रुविकरणाचा आयाम दिला, ही बाब कुणी नाकारू शकत नाही. मात्र, आता या राज्यातील जनतेने भाजपला विक्रमी बहुमत प्रदान केल्यानंतर होणारे धमकावण्याचे प्रकार हे गैर आहेत. यातच आता देवबंदसह युपीतल्या काही शहरांची नावेदेखील बदलण्याचे संकेत मिळाले आहेत.
भाजपचे वादग्रस्त नेते योगी आदित्यनाथ यांनी तर मध्यंतरी एका वाहिनीशी बोलतांना ताजमहालाचे नावदेखील बदलण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. आपण इतिहासाकडे तटस्थ पाहणे शिकले पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही. हे प्रकार गैर असून दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे आहेत. भारतीय संविधानानुसार धार्मिक आधारावर भेदाभेद पाळता येणे अशक्य आहे. आपल्या देशात सर्वांना समान संधी आहे. यामुळे विविध धर्म, जाती, भाषा, वंश, पंथ, संस्कृती आदींच्या आधारावर कोणताही भेद केला जाऊ नये, हे अपेक्षित आहे. मात्र, धर्माच्या आधारावर भारतीय समाजाला विभाजीत करण्याचे काम आता होऊ लागले आहे. याचमुळे सुहाना आणि नाहीद या तरुणींना धमकावणारे लोक आणि युपीतल्या मुस्लीमांना इशारा देणारी मंडळी ही एकाच प्रकारातील म्हणावी लागणार आहे. सुदैवाने या दोन्ही तरुणींनी कट्टरपंथियांच्या इशार्यासमोर न झुकण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळीदेखील त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. याच पद्धतीने बरेलीसह परिसरातील हिंदू समाजबांधवांनी समोर येऊ मुस्लीमांना धमकावण्याच्या प्रकाराचा निषेध करण्याची गरज आहे. विशेष करून उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसांत नवीन मुख्यमंत्री सत्तारूढ होणार असून त्यांनीच यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मुस्लीम समुदायाच्या मनातील भीती काढणे अपेक्षित आहे. अन्यथा, येत्या कालखंडात धार्मिक भेदाची भिंत ही खूप मोठी होण्याचा धोका आहे.