सावरकरांच्या बाबतीत शिवसेनेच्या भूमिकेत बदल: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई: सावरकरांच्या बाबतीत शिवसेनेने आपली भूमिका बदलवली असून, त्यांची प्रतिक्रिया अत्यंत मवाळ असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सावरकरांच्या विरोधात अगोदर जर कुणीन काही बोलले तर शिवसेनेची प्रतिक्रिया जहाल असायची, आता मात्र ती नरम का पडली? हा माझ्यासमोर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला फडणवीस यांनी डिवचले आहे.

सत्तेसाठी शिवसेनेला कुठल्या लोकांसोबत तडजोड करावी लागत आहे हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र आणि देश कधीही सहन करणार नाही. यापूर्वीच्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया आपण बिघतलेल्या आहेत. सत्तेसाठी शिवसेनेच्या भुमिकेत बदल झाला आहे त्यामुळे त्यांना त्यांची सत्ता लखलाभ. राहुल गांधी बारा तासही अशा प्रकारे काळ्या कोठडीत राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सावरकरांबाबत बोलण्याचा अधिकार नाही. केवळ आपल्या नावापुढे कोणी गांधी लावलं म्हणून कोणी गांधी होत नाही.

राहुल गांधी यांनी केलेलं विधान हे अत्यंत लाजिरवाणं आहे. सावकरांबाबत कदाचीत त्यांना माहिती नाही. दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा होणं हे भारताच्या इतिहासात एकाच क्रांतिकारकाबाबत घडलंय आणि ते नाव म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर. बारा वर्ष अंदमानाच्या काळ्या कोठडीत सावरकरांनी ज्या प्रकारच्या अनन्वित अत्याचारांना सहन केलं आहे ते कदाचित देशाच्या इतिहासात कोणीही केलेलं नसेल, असंही फडणवीस म्हणाले.