निगडी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सावरकर मंडळातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विधायक थोरात, मंडळाचे पदाधिकारी विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, प्रदीप पाटील, विश्वास करंदीकर, भाजपाचे पदाधिकारी अनुप मोरे, राजेंद्र बाबर, सलीम शिकलकर, दीपक नलावडे, रमेश बनगोंडे, महिला विभागाच्या पदाधिकारी सुमती कुलकर्णी, वैदेही पटवर्धन, शिल्पा बिबीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सावरकरांचे योगदान अतुलनीय
यावेळी बोलताना अमित गोरखे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे. सावरकर एक वकील, लेखक, कवी, नाटककार आणि एक मुत्सद्दी राजकारणी होते. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास प्रथम त्यांनी लिहिला. त्यांच्या एकंदर जीवनात उपयोगितावाद, तर्कवाद, सकारात्मकवाद, मानवतावाद, सार्वभौमिकता, व्यावहारिकता आणि यथार्थवाद या वैचारिक तत्वांचा अवलंब झालेला आपल्याला दिसून येतो. सर्वच धर्मांमधील रूढीवादी विचारांचा त्यांनी विरोध केला. तसेच हिंदू धर्मातील ज्या लोकांनी अन्य धर्म स्वीकारला आहे, अशा लोकांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी विविध आंदोलने केली. भारताची सामुहिक ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ‘हिंदुत्व’ या शब्दाची निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर रिकामे यांनी केले.