सावरकर साहित्य संमेलनाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

0

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर हे जन्माने, कर्माने हिंदू होते. वृध्द झाल्यानंतर अन्नपाण्याचा वर्ज्य करत देहत्याग करुन या भुमीत पुन्हा जन्म घेऊन देशाची सेवा करण्याची मनिषा बाळगणारे सावरकर महान देशभक्त होते. त्याच्या देशभक्तीबद्दल शंका घेणाऱ्यांना त्यांच्या पिढ्या माफ करणार नाहीत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ठाणे येथे २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी व्यासपिठावर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे अध्यक्ष रमेश पतंगे, ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे, खा. विनय सहस्रबुध्दे, राजन विचारे, कपिल पाटील, आ. संजय केळकर, रविंद्र फाटक, किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, उल्हासनगरच्या महापौर मिना आयलानी, दादा इदाते आदी मान्यावर उपस्थित होते. याप्रसंगी सावरकरांवरील क्रांतीसुर्य या स्मरणिकेचे तसेच हिंदुराष्ट्र काळाची गरज या पुय्तकाचे शहा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना अमित शहा पुढे म्हणाले की, हे सावरकर साहित्य संमेलन महाराष्ट्रापुरते मर्यादीत न ठेवता ते देशभरातील सावरकर प्रेमींपर्यत नेण्यासाठी विस्तारले पाहीजे. मी सावरकरांना वाचणारा आहे. ते गद्यात श्रेष्ठ होते की पद्यात हे कोणी ठरवू शकत नाही. ‘तुजसाठी मरण हे जनन…’ यासारखे काव्य हे अद्वितीय देशभक्तच रचु शकतो असे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोट्यवधी जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे काम केले आहे. त्यांनी निर्माण केलेले साहित्य अंधाऱ्या रात्रीमध़्ये प्रकाश देऊन मार्ग दाखविणाऱ्या दिव्याप्रमाणे असल्याचे शहा म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याच्या मागणीच्या पार्श्वभुमीवर बाेलताना शहा म्हणाले की, अनेकांना पुरस्कार मिळाले. पण कोट्यावधी जनतेने सावरकरांच्या नावापुढे ‘वीर’ हा शब्द जोडला. त्यासाठी काही शिक्षण लागले नाही कोणता ठराव करावा लागला नाही, संसदेत प्रस्ताव पारीत करावा लागला नाही. कोट्यावधी जनतेने त्यांना वीर ही पदवी बहाल केली आणि जगाने ती स्विकारली. हीच सावरकरांची ओळख आहे. अशा महान व्यक्तीला कोणत्या उपाधीची गरज नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले.

ज्या अंदमानात सावरकरांना कारगृहात ठेवण्यात आले होते, त्यांना अनेक यातना देऊन त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तेथील ज्या कोठडीत त्यांना ठेवले होते त्याच्या समोरच दररोज सरासरी तीन लोकांना फाशी दिले जात होते. मात्र सावरकरांचे मनोबल अबाधीत राहीले. त्या जागी भाजप सरकारच्या काळात सावरकर ज्योत उभारण्यात आली होती. पण कॉंग्रेसचे- युपीएचे सरकार आल्यानंतर ती ज्योत काढून टाकण्यात आली, नष्ट करण्यात आली. मात्र भाजपचे सरकार देशात आले आणि ती तेथे पुन्हा बसवण्यात आल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठानचे विद्याधर ठाणेकर यांनी आपल्या मनोगत व्याक्त करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्या उपस्थित सावरकरप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठींबा दर्शविला. त्यानंतर संमेलनाला शुभेच्छा देताना पासकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी लाखो नागरीकांनी स्वाक्षरी मोहीमेत सह्या करुन समर्थन दिल्याची सांगत ही मागणी पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली.