हडपसर । सावली फाउंडेशन व जय महाराष्ट्र मित्र मंडळ यांच्या वतीने यावर्षी दहीहंडी रद्द करून त्या पैशांमधून विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हडपसरमधील पांढरेमळा येथील आर्थिक दुर्बल घटकातील विशेष विद्यार्थिनीला व पंढरपूर येथील एड्सग्रस्त बालकांसाठी चालविण्यात येणार्या पालवी या संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली.
यावर्षी विधायक पुस्तक हंडी करण्याचा संकल्प प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाणे यांनी केला होता. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पांढरेमळा येथे पुस्तक हंडीचे आयोजन केले. पांढरेमळा येथील विद्यार्थिनीला आर्थिक मदत तसेच मुलांना पुस्तके देण्यात आली. याप्रसंगी स्वाती पाटील, पूजा मरळे, श्रीनिवास पाटील, अंतेश्वर मठपती, नारायण मरळे, फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.