भुसावळ। आषाढी एकादशी निमित्त शहर व परिसरातील विठ्ठल मंदिरांमध्ये आपल्या लाडक्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मंगळवार 4 रोजी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तसेच काहि ठिकाणी फराळ वाटप, तर शाळा व संस्थांतर्फे टाळ मृदंगाच्या गजरात पारंपारिक वेशभूषा साकारुन दिंडी काढण्यात आली. सर्वत्र विठ्ठल नामाच्या गजराने मंदिर व परिसर दुमदुमला. त्यामुळे सर्वत्र दिवसभर उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.
कंडारी येथे महाभिषेक
येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात पहाटे विठ्ठल रुख्मिणी यांच्या मुर्तीचा मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी पंडीत निलेश कुळकर्णी यांनी पौरोहित्य केले. गावातील महिला भजनी मंडळातर्फे दुपारी गीता पठणासह विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यात आले. तसेच अभंग गायण्यात आली. गावातील भाविकांनी संध्याकाळी दर्शनासाठी गर्दी केली.
विठ्ठल मंदिर परिसरात दिंडी
विठ्ठल मंदिर वार्ड भागातील पुरातन मंदिरात श्रीविठ्ठल रुखमाई यांच्या मूर्तीस महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल रुखमाई यांच्या मूर्तीला रेशमी महावस्त्र परिधान करण्यात येऊन सोन्याचांदीचे दागदागिने व आभूषणांनी साजशृंगार करण्यात आला. यावेळी महिला भजनी मंडळातर्फे अभंग सादर करण्यात आली. त्यामुळे संपुर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. सायंकाळी मंदिर परिसरात ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात दिंडी काढण्यात आली. यामध्ये शहरातील भाविकांनी सहभाग घेतला.
मुक्ताईचरणी भाविकांची मांदीयाळी
श्रीक्षेत्र मुक्ताई समाधीस्थळ कोथळी – मुक्ताईनगर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मंगळवार 4 रोजी पहाटे 5 वाजता काकडा भजनाने पहाटे मंगलमय वातावरणात मुक्ताई महापुजा, अभिषेक खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते करण्यांत आला. यावेळी माजी सभापती सुलभा पाटील व भाविक उपस्थित होते. सकाळी हभप रामेश्वर महाराज तिजारे यांचे प्रवचन झाले. दुपारी पाऊसही ये जा करित असल्याने भाविकांची यात्रेतील दुकानदाराची धावपळ उडाली. चार्तुमास आरंभ निमित्त संत एकनाथ महाराजकृत भागवताचे पारायणला आरंभ करण्यात आला. हे पारायण 4 महीने चालेल. स्थानिक गुरुदेव भजनी मंडळाने जागरभजन सादर केले. एकादशीनिमित्त भाविकांना फराळाची व्यवस्था राजेंद्र पानकर, मलकापूर यांनी केली. जे भाविक पंढरपूर येथे प्रापंचिक वा अन्य कारणाने पंढरीस जावू शकत नाही ते आषाढी एकादशी असल्याने मुक्ताईचरणी नतमस्तक होतात. पोलिस निरीक्षक कडलग यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला.
श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
रावेर तालुक्यातील तामसवाडी येथील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या. पहाटे मंदीर विश्वस्तांच्या हस्ते विठ्ठल-रुखमाईच्या मुर्त्यांचा मंत्रोपचारात अभिषेक करण्यात आला. यानंतर महाआरती होवून पसायदानाचे सामुहिक वाचन यावेळी करण्यात आले. तसेच विठ्ठल-रुखमाईच्या मुर्त्यांना रेशमी वस्त्र घातल्यामुळे या मुर्त्या आकर्षक दिसत होत्या. यावेळी भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. बाहेरगावहून आलेल्या भाविकांनी देखील फराळाचा लाभ घेतला.
दहिगाव येथे महापुजा
दहिगाव येथील विठ्ठल-रूख्माई मंदिरात नऊ जोडप्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पहाटे चार वाजेपासून पुजेला सुरुवात झाली. यानंतर नऊ जोडप्यांच्या हस्ते होमहवन करण्यात आला. जिल्हाभरातून दाखल होणार्या दिंड्यांचे मंदिर संस्थानकडून स्वागत करण्यात आले. यात्रेनिमित्त पूजा विक्रीची अनेक दुकाने लागली होती.