सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षणात सरस

0

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशातील पहिल्या सर्वोत्तम दहा विद्यापीठांत स्थान पटकावले आहे. देशातील सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाला पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. उच्च शिक्षणाचा सर्वोत्तम दर्जा असणार्‍या देशातील संस्थांची यादी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी जाहीर केली. त्यात देशातील पहिल्या दहा विद्यापीठांत पुणे विद्यापीठाने दहावे स्थान पटकावले.

मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरला
देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या क्रमवारीत बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने अव्वलस्थान पटकावले आहे. या यादीत बेंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहे. देशातील सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार्‍या मुंबई विद्यापीठाला या यादीत स्थान पटकावता आलेले नाही. मात्र, सर्वोत्कृष्ट संस्थांच्या यादीत व सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग संस्थांमध्ये आयआयटी मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे.

नॅककडून विद्यापीठांचे मूल्यमापन
अध्यापनाचा दर्जा, शैक्षणिक सुविधा, निकालाचे प्रमाण, शिक्षणाचा दृष्टिकोन, विद्यार्थ्यांशी संवाद व सर्वसमावेशकता आणि उत्पादक संशोधन या निकषांच्या आधारे नॅककडून या शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले होते. यंदा 800 नव्या शैक्षणिक संस्थांनी या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून यंदा वैद्यकशास्त्र आणि विधी शाखेच्या सर्वोत्तम महाविद्यालयांचीही यादी जाहीर केली. दरम्यान, जुलैपासून विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी ‘नॅक’कडून नवीन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘नॅक’चे संचालक डी. पी. सिंग यांनी नुकतीच सूचना जारी केली आहे.

हेे सर्वांचे यश : डॉ. गाडे
देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठाचा समावेश होणे ही आमच्यासाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे. या यशात विद्यापीठातील सर्वांचाच वाटा असून, हे सर्व सहकार्‍यांच्या परिश्रमामुळे शक्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने प्रथमच विद्यापीठ रँकिंगमध्ये भाग घेतला होता. पहिल्या प्रयत्नातच मिळालेल्या या यशामुळे आमच्या श्रमाचे चीज झाले आहे. पुढच्या वर्षीपासून विद्यापीठ संपूर्ण तयारीनिशी उतरले आणि पहिल्या पाचमध्ये येण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.