सावित्री नदीवरचा नवीन पूल पाच जूनपासून सुरू

0

मुंबई – सावित्री नदीत ४५ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पुलाला संजीवनी देणाऱ्या नव्या पुलाचे उद्घाटन येत्या पाच जूनला होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल गेल्या वर्षी दोन ऑगस्टला कोसळला होता. या दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल सहा महिन्यांत नव्याने बांधण्यात येईल, अशी घोषणा केली होती. सहा महिन्यांत हा पूल पूर्ण झाला नसला तरी नवीन पुलाचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून पाच जूनला तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. नितीन गडकरी यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्ग मार्चपर्यंत पूर्ण
दरम्यान, गेली अनेक वर्षे रखडलेला आणि मृत्यूचा महामार्ग असे वर्णन केल्या जाणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गाचे सध्या जोरात काम सुरू असून ते जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे गडकरी यांनी एमएमआरडीएच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. या महामार्गावरील पनवेल-इंदापूर टप्पा मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. या टप्प्यामुळेच गेले बरीच वर्षे या महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नव्हते. त्याचबरोबर मुंबई-गोवा कोस्टल रोडचा डीपीआर पूर्ण झाला असून ३१ मे पर्यंत निविदा काढण्यात येणार आहे. पंढरपूरला देहू आणि आळंदीवरून जाणारे दोन्ही पालखी महामार्ग जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण केले जाणार असून पुणे-सातारा रस्त्याचे काम ८२ टक्के कामे पूर्ण झाले आहे. खंबाटकी घाट टाळण्यासाठी साताऱ्याला जााण्याच्या मार्गावर आणखी एक बोगदा बांधला जात आहे. रायगड किल्ला विकासासाठी ६५० कोटी खर्च केले जाणार असून त्यापैकी २६० कोटी महाड ते रायगड रस्त्याकरिता वापरले जातील, असेही गडकरी म्हणाले.

अमर महलच्या पुलासाठी लागणार ४ महिने
मुंबईतील अमर महल येथील पुलाचा सांधा निखळण्याच्या प्रकरणानंतर हा नादुरूस्त पूल दुरूस्त करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. हा पूल दुरूस्त होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र, नेमक्या कोणत्या कारणाने हा पूल नादुरूस्त झाला याचे कारण अद्याप शोधता आले नसल्याची कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली.