रायगड । महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेला दहा महिने होत असतानाच निविदा निघाल्यापासून सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्याचा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाळला. 180 दिवसांचे उद्दिष्ट असताना 165 दिवसांमध्ये पूर्ण करण्याची कामगिरी राज्याच्या बांधकाम खात्याने केली.
35 कोटी 77 लाख रुपये खर्चून बांधलेल्या या नव्या पुलाचे नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत सोमवारी उद्घाटनही होत आहे. पनवेल- पणजी राष्ट्रीय महामार्गावरील 1928मध्ये बांधलेला पूल 1 ऑगस्टच्या काळरात्री वाहून गेला होता. त्यामध्ये 42 जणांचा बळी गेल्याची अधिकृत माहिती आहे. तो पूल पाडण्याचे नियोजन सुरू असतानाच दुर्घटना घडली. पुण्याच्या टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कंत्राट मिळाले.