सासरचा छळ असह्य झाल्याने वरणगावात विवाहितेची आत्महत्या

वरणगाव : सासरचा छळ असह्य झाल्याने सावदा येथील माहेर व वरणगाव येथील सासर असलेल्या 21 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजता घडली. रुकसारबी शाहरुख खान (22 , रा.अक्सा नगर, वरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मुलीचा सासरच्यांनी छळ केल्याने तो असह्य झाल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केल्याने पोलिसांनी पती शाहरुख उस्मान खान, दीर मुश्तकीन खान आणि सासू जोहराबी खान, सासरा उस्मान खान, नणंद नाजमीबी जहिर खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला व विवाहितेचा पती, सासू आणि दीर यांना अटक केली.

जळगावात इनकॅमेरा शवविच्छेदन
सावदा येथील माहेर असलेल्या रुकसारबी शाहरुख खान (22, रा.अक्सा नगर, वरणगाव) हिचे दोन वर्षांपूर्वी शाहरुख खान याच्याशी लग्न झाले मात्र लग्नापासून रूकसारबी पसंत नसल्याने तिचा छळ करण्यात आला तसेच अन्य क्षुल्लक बाबींवरूनही तिचा छळ करण्यात आल्याने त्यास कंटाळून तिने शनिवारी सकाळी 11.30 वाजता ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार मयताचे वडील मो.शफी यांनी दिल्यावरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तपास सहा.पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील वाणी, हवालदार भूषण माळी, मजहर पठाण, अतुल बोदडे करीत आहेत.