सासरच्या जाचाला कंटाळून खंडाळ्यातील विवाहितेची आत्महत्या : पतीसह चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथील सुनीता विजय पाटील या 33 वर्षीय विवाहितेने सासरीच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेपूर्वी घडली. पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत तसेच अन्य किरकोळ कारणावरून सासरचे लोक छळ करीत असल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार मयत विवाहितेच्या भावाने दिल्याने पतीसह आठ आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पतीसह, दीराणी व सासु-सासर्‍यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघे पसार झाले आहेत.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
खंडाळा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.

या आरोपींविरोधात दाखल झाला गुन्हा
मयत सुनीता हिला आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयताचा भाऊ संदीप युवराज पाटील (30, देवगाव, ता.चोपडा, ह.मु.सातपूर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी पती विजय बाळू पाटील, सासु अंजनाबाई बाळू पाटील, सासरे बाळू उखर्डू पाटील, दीर भागवत बाळू पाटील, दिराणी रोहिणी भागवत पाटील (सर्व रा.खंडाळा, ता.भुसावळ), मोठी नणंद भारती विनोद पाटील (जळगाव), लहान नणंद प्रतिभा संजय पाटील, लहान नंदोई संजय भास्कर पाटील (रा.देवगाव, ता.चोपडा) यांच्याविरोधात गुरनं.001/2022, भादंवि 306, 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी पतीसह दीर, सासु व सासरे यांना अटक करण्यात आली तर अन्य आरोपी पसार झाले आहेत. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.

या आरोपींना पोलिसांनी केली अटक
विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी आरोपी पती विजय बाळू पाटील, सासु अंजनाबाई बाळू पाटील, सासरे बाळू उखर्डू पाटील, दिराणी रोहिणी भागवत पाटील (सर्व रा.खंडाळा, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.