सासर्‍यासह शालकाच्या पत्नीला मारहाण

0

जळगाव। आदर्शनगरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापकांना आणि त्यांच्या सूनेला जावयाने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता फरशीच्या तुकड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सासर्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून जावयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जावई हा धुळे येथील रहिवाशी आहे.

तेरा वर्षापूर्वी झाले होते लग्न
एसबीआयचे निवृत्त व्यवस्थापक भुराज गिरीधर मोरे (वय 62, रा. आदर्शनगर) यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची लहान मुलगी दीपमाला हिचे 13 वर्षापुर्वी प्रशांत नामदेव वाघ (वय 40, रा. धुळे) याच्या लग्न झाले. मात्र प्रशांत दीपमाला हिला नेहमीच त्रास देत होता. त्यामुळे काही वर्षापुर्वी ती माहेरी निघून आली होती. मात्र गेल्या वर्षी समेट घडविण्यात आला. अभियंता असलेल्या प्रशांत याने पत्नीला मारहाण करणे सुरूच ठेवल्याचा आरोप मोरे यांनी केला. 18 मे रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास प्रशांतने पुन्हा पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दीपमाला लहान मुलगा संस्कार (वय 10) याला घेऊन वडीलांकडे निघून आली होती.

मोरेंच्या चेहर्‍यावर फरशीने केला वार
शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता प्रशांत सासरी येवून मोरे यांच्याशी वाद घालून शिविगाळ केली. त्यावेळी प्रदीप आणि त्याची पत्नी स्नेहा प्रदीप मोरे हे वरच्या मजल्यावरून खाली आले. त्यावेळी प्रदीप याने आरडा ओरड करू नको, असे सांगत प्रशांतला घरी जाण्यास सांगितले. प्रशांतने बाहेर जाऊन शिविगाळ करण्यास सुरूवात केली. समोरील बांधकामाच्या ठिकाणाहून प्रशांतने एक फरशीचा तुकडा घेऊन प्रदीपला मारहाण करीत असताना पत्नी स्नेह अडविण्यासाठी आली. त्यावेळी प्रशांतने स्नेहाच्या डोक्यात फरशीने वार केले. त्या खाली पडल्यानंतर त्याने भुराज मोरे यांच्या चेहर्‍यावर फरशीने वार केले. या हाणारीत दोघे गंभीर जखमी झाले.