पुणे । सासवड येथील पुरंदर विद्यापीठ हे अनधिकृत असून संस्थेमार्फत सुरु ठेवलेला पाठ्यक्रम, अभ्यासक्रमालादेखील कोणतीही मान्यता नसल्याचे पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी सांगितले आहे. तसेच या शैक्षणिक संस्थेत कोणत्याही अभ्यासक्रमास व पाठयक्रमास चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यानी प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन नारखेडे यांनी केले आहे.
पाठ्यक्रम बंद करण्याचे आदेश
विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्र कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम, 2013 मधील तरतूदीचा भंग होत असल्याने संबंधित व्यवस्थापनास अभ्यासक्रम, पाठ्यक्रम बंद करण्याबाबत आदेशित केले आहे. यानुसार संचालक, पुरंदर विद्यापीठ, सासवड, यांच्यामार्फत सुरु असणारे अध्ययनक्रम, अभ्यास व पाठ्यक्रम बंद करीत असल्याचे शिक्षण विभागास कळविले आहे. तरी या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत, प्रवेश घेतल्यास असे प्रवेश अनधिकृत असतील, असेही उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. नारखेडे यांनी कळविले आहे.