पुणे । सासवड रोडवरील दुतर्फा असलेल्या अतिक्रमणावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने कारवाईचा हातोडा उगारला. कारवाईत सुमारे 95 व्यावसायिकांचे चायनिज स्टॉल, शेड व ओटे हटवण्यात आले. कारवाई दरम्यान व्यावसायिक व अधिकार्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ही कारवाई सुरळीतपणे पार पडली.
रुंदीकरण रखडले
सासवड रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण, रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, दुतर्फा मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमणे यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच होत होती. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत होता. मात्र हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्यानंतर हडपसर वाहतूक विभाग व नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महामार्ग विभागाने तातडीने अतिक्रमण कारवाई केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र रखडलेले रुंदीकरण व रस्त्याची झालेली चाळण यावर तातडीने उपाययोजना कराव्यात व कारवाईनंतर पुन्हा या मार्गावर अतिक्रमणच होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांनी केली.
पोलिस बंदोबस्तात कारवाई
हडपसर ते भेकराईनगर दरम्यान असलेले अतिक्रमे हटवण्यात आली. यामध्ये पान टपर्या, चायनिज व वडापाव स्टॉल, फळे व भाज्या हातगाड्या, हॉटेलचे अनधिकृत शेड, ओटे दोन जेसीबीच्या सहायाने हटविण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग, पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अशोक गिरमे व फुरसुंगी गावचे ग्रामसेवक व कर्मचार्यांनी पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. तसेच यामार्गावर पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण करणार्यांना प्रशासनाने दिला आहे.