सासुरवाशीणीसारखा पळ काय काढता?

0

विधान परिषदेच्या विशेष सत्रात विरोधकांच्या गोंधळात कामकाज पुढे जातच नव्हते. उपसभापतीच्या उपस्थितीत 3 वेळा कामकाज तहकूब करावे लागल्याने सत्ताधारी चांगलेच वैतागले होते. मात्र विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने त्यांचा नाईलाज होता. सभागृह चालू द्यायचे असल्यास महेतंचा राजीनामा घ्या या विरोधकांच्या मागणीला सत्ताधारी मोठ्या संयमाने तोंड देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विनोद तावडे यांचा संयम सभागृह तिसर्यांदा स्थगित झाल्यावर सुटला. आपण आता जाऊ , परत यायलाच नको असे ते चंद्रकांत पाटील याना आणि इतर मंत्र्याना सांगू लागले. आम्ही जातो, आम्ही जातो असे म्हटल्यावर विरोधी बाकावर बसलेले भाई जगताप यांचा पारा चढला. सासुरवाशीनीसारखे पुन्हा पुन्हा पळ काय काढता ? निघून जा .. असे उदगार काढले. भाई जगताप यानी असे उदगार काढल्यानंतर विनोद तावडे आणि भाई जगताप यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. सभागृह स्थगित झाल्यावही भाई जगताप यांच्या संतापाचा पारा इतका दिसून आला की त्यानी तावडे यांची औकात काढली. यावर एकेरी संबोधू नका आणि औकातही काढू नका असा इशारा तावडे यानी दिला. पडद्यामागे घडलेल्या या नाट्यमय घडामोडीचा जोर अतिशय तीव्र होता यात वाद नाही.

दहावी पास होउनही अर्थशास्त्र उत्तम
सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर सुनील तटकरे यानी आपल्या भावना व्यक्त केल्या. तटकरे आपल्या आठवणी सांगत असताना मध्येच बाजूला बसलेल्या नारायण राणे यानी तटकरे यांच्या एका शब्दावर बोट ठेवले मात्र त्यावेळी त्याना रोखत तटकरे यानी त्याना त्यांच्याविषयीची आठवण करुन दिली. एक दहावी शिकलेला माणूस अर्थशास्त्राचा उत्तम व्याख्याता आहे अशी तुमची तारीफ़ शरद पवारांनीच केली होती अशी आठवण त्यानी राणेना करुन दिली. राणेंनीही आपल्या आठवणीतील पवार सांगताना काँग्रेसमध्ये टिकायचे असेल आणि वर यायचे असेल तर बंडखोरी करावीच लागते असा सल्ला त्यांनी दिल्याची आठवण सभागृहाला सांगितली. आतापर्यंत स्वतः पवारसाहेबांनी 12 वेळा बंडखोरी केली असल्याचे त्यानी नमूद केले.
– सिमा महांगडे