हैदराबाद : कसोटीच्या पहिल्या दिवशी एक किश्श्याने कोहलीसह सामन्याचे समालोचकांनाही हसू अनावर झाले. संघाची धावसंख्या २२३ इतकी असताना कोहलीसोबत हा हास्यास्पद प्रसंग घडला. कोहली तेव्हा ३१ धावांवर, तर मुरली विजयचे नुकतेच शतक पूर्ण झाले होते. बांगलादेशचा गोलंदाज तैजुल इस्लामने टाकेलल्या फुल लेंथ गोलंदाजीवर कोहलीने डिफेन्सिव्ह फटका खेळला. पण बांगलादेशचा कर्णधार आणि यष्टीरक्षक मुशफिकुर रेहमानने या चेंडूवर पंचांकडे कोहली पायचीत झाल्यासाठीचा रिव्ह्यू मागितला. रेहमानच्या निर्णयावर सर्वच आश्यर्यचकीत झाले. कारण, तैजुलने टाकलेला चेंडू कोहलीच्या बॅटवर आदळल्याचा स्पष्ट दिसत होते आणि आवाज देखील झाला होता. खुद्द गोलंदाज तैजुलने चेंडू टाकल्यानंतर कोहली बाद झाल्याची अपील देखील केली नव्हती. केवळ मुशफिकुरने कोहली बाद झाल्यासाठीची अपील केली होती. मुशफिकुरने कोहलीने चेंडू खेळल्यानंतर थोडा वेळ घेऊन शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खेळाडूशी चर्चा केली. खरंतर गोलंदाजाने रिव्ह्यू घेण्याबाबत अजिबात रस दाखवला नाही. तरीसुद्धा मुशफिकुरने पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली. रिव्ह्यूमध्ये चेंडू कोहलीच्या बॅटच्या अगदी मधोमध लागल्याचे निष्पन्न झाले आणि कोहलीच्या चेहऱ्यावर हसू उमटले.