भुसावळ- सामान्य स्त्री प्रमाणे मी पण पारीवारिक स्वप्न पाहिले होते पण नियतीने अकाली वैधव्य दिले मात्र खचून न जाता येणार्या सर्व संकटांचा सामना देत मी कधी लेखिका झाली हे मला कळलेच नाही, माझ्या दु:खाचा भार हलका करण्यासाठी साहित्याचे योगदान मोलाचे आहे म्हणून साहित्यच माझे दैवत आहे, असे प्रतिपादन लेखिका सीमा भारंबे यांनी येथे केले. वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघ आयोजित ‘मी असे घडले’ या उपक्रमांतर्गत शनिवारी महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रचंड आशावादी राहा
प्रत्येकाने जीवनात आशावादी असावे त्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक शिक्षक प्रचंड आशावादी होते. प्रत्येक बाबतीक ते सकारात्मक विचार शोधायचे त्यामुळे त्यांच्या मित्रांना त्यांची गंमत घेता येत नव्हती. एके दिवशी त्यांच्या शर्टवर पक्षाने घाण केली, तेव्हा त्यांच्या मित्रांनी यात काय आशावाद असेल असे विचारले? तेव्हा शिक्षक म्हणाले, देवा बरं झाले, हत्तीला उडता येत नाही.. यावेळी ज्येष्ठ नागरीकांमध्ये हास्याचे फवारे उडाले.
लिखाणातूनच मिळाली जगण्याची प्रेरणा
भारंबे म्हणाल्या की, माझ्या मोगराची फुले, नियती, चंद्रग्रहण, लढा आदी लिखाण हे वास्तववादी असून त्यातूनच मला जगण्याची प्रेरणा मिळते. डॉ.नि.तु.पाटील यांचे कार्य पथदर्शी असून त्यांचे ज्येष्ठाचे संघटन कौतुकास्पद आहे. यावेळी धनराज पाटील, विश्वनाथ वाणी, प्रभाकर झांबरे, अशोक पाटील, श्रीकांत चौधरी, यमुना वारके, रजनी तळेले, अजनी राणे, भारंबे, यशवंत वारके, मुकुंद वारके, प्रमिला धांडे, प्रमोद बोरोले, सुरेश नेहेते आदी ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश पाटील तर आभार धनराज पाटील यांनी मानले.