अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे मत
भिलार येथे लेखक-प्रकाशक संमेलन
पुणे : साहित्याची अभिजनांचे साहित्य आणि बहुजनांचे साहित्य अशी विभागणी करणे मुर्खपणाचे आहे. विभाजनाचा हा निकष जर धरला तर कवी ग्रेस, पुलं, गदीमा आदी नाना यशस्वी लेखकांचे साहित्य कोणत्या वर्गवारीत मोडणार हा प्रश्न निरुत्तरीत राहतो. कलाकार, लेखक, विचारवंत, साहित्यीक त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून माणस जोडण्याचे काम करीत असल्याने अशी संकुचीत विभागणी करणे अपेक्षित नसल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांचे गाव, भिलार येथे आयोजित दोन दिवसीय लेखक-प्रकाशक संमेलनाच्या दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात साहित्य विश्वातील सद्यस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादात डॉ. राजेंद्र माने, रमेश राठीवडेकर, विनोद कुलकर्णी, संजय भास्कर जोशी सहभागी झाले होते.
सरकार सत्तेची बाजू घेते हीच शोकांतिका
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला तर भाषिक संघर्ष पेटून इतरही भाषीकांचा अभिजात दर्जा प्राप्तीसाठी पाठपुरावा सुरू होईल. त्यामुळे सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यात चालढकलपणा करीत आहे. पंरतू 12 कोटीच्या महाराष्ट्रातील मराठी माणसाने एकमुखाने एकदिलाने आवाज टाकला तर त्यांच्यात सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे, हे सरकारच्या लक्षात यायाला पाहिजे. सरकार कोणाचे असो प्रत्येक सरकार सत्याची बाजू घेण्याएवजी सत्तेची बाजू घेतो ही शोकांतिका आहे, असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुढे बोलताना सांगितले.
तरुण लेखक गोंधळलेला दिसतो
लेखक प्रकाशकांना मान्यता देणार्या संस्थांचे विक्रेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात उत्तमउत्तम लेखक, प्रकाशकांचे जाळे आहे. तरुण लेखकांच्या बाबतीत तरुण लेखक जगण्याचा वाढता वेग आणि आंकुचित पावत जाणारे जीवन यामुळे गोंधळलेला अवस्थेत दिसतो. त्यांचे जगणे विखंडीत झाले आहे. ते हा जगण्याचा वेग पकडू पाहत असल्याने नवनवीन साहित्य प्रकार हाताळताना दिसतात. तसेच जे पुस्तक ऑऊट ऑफ प्रिंट झाली आहेत ती प्रकाशकांनी पुर्नमुद्रीत करावी, असे संजय भास्कर जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.