भुसावळ। साहित्य हा समाजाचा आरसा आहे. समाजात घडणार्या अनेक घटना प्रत्यक्षपणे अथवा काल्पनिकपणे मांडून समाजप्रबोधन करण्याचे काम साहित्य करत आहे. साहित्याच्या माध्यमातून साहित्यिकाला जसा आनंद मिळतो तसा वाचकाला तो आनंद मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्नरत असणार्या व सकारात्मक विचार पेरणार्या सहा साहित्यकृती असल्याचे विचार विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
भुसावळ येथील मैफल प्रकाशन, आत्मीय परिवार, मधुकर चौधरी परिवार, प्रणव विठ्ठल पाटील परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सहा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार 16 रोजी खडका रोड भागातील तळेले कॉलनीत असलेल्या मैफल सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा येथील ललीत कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजू महाजन होते. प्रास्ताविकात मैफल प्रकाशनचे काशिनाथ भारंबे उर्फ निर्मोही यांनी पुस्तक प्रकाशनाची भूमिका मांडली. साहित्यिकांतर्फे मधुकर चौधरी, गजमल पाटील, प्रणव पाटील, काशिनाथ भारंबे यांनी मनोगत व्यक्त केले.
सहा पुस्तकांचे प्रकाशन
तरंग आणि लाटा 19 कवींच्या 190 कवितांच्या प्रतिनिधीक कवितासंग्रहाचे प्रकाशन कुर्हा काकोडा येथील साहित्यिक निंबाजी हिवरकर यांच्या हस्ते झाले. विटा सांगली येथील आशराबी शिकलगार यांच्या अस्तित्व कथासंग्रहाचे प्रकाशन द.शि. विद्यालयाचे उपशिक्षक डॉ.जगदीश पाटील यांच्या हस्ते झाले. कळवा ठाणे येथील मधुकर चौधरी यांच्या पेरले हुंकार उगवले ओंकार या कवितासंग्रहाचे प्रकाशन चोपडा येथील कवी प्रा.अशोक निळकंठ सोनवणे यांच्या हस्ते झाले. बलवाडी रावेर येथील कै.प्रा.विठ्ठल पाटील यांच्या शब्दांच्या सावलीत या कवितासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक वंदना बाचकर यांच्या हस्ते झाले. धामणगाव मध्यप्रदेश येथील गजमल पाटील यांच्या श्रीराम कथायन या श्रीराम चरित्रकथा पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य राजू महाजन यांच्या हस्ते झाले. कवी काशिनाथ भारंबे उर्फ निर्मोही यांच्या उणे अधिक उणे या गझलसदृश संग्रहाचे प्रकाशन औरंगाबाद येथील कवी प्रा.ज्ञानेश्वर कुळकर्णी यांच्या हस्ते झाले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी डॉ.जगदीश पाटील, निंबाजी हिवरकर, प्रा.अशोक सोनवणे, प्रा.ज्ञानेश्वर कुळकर्णी यांनी साहित्यकृतींविषयी माहिती देवून साहित्य हे मनाला आनंद देणारे असते असे सांगितले. प्रकाशक काशिनाथ भारंबे यांनी पत्रलेखनाचे महत्व सांगून उपस्थितांना पोस्टकार्ड व पेनचे वाटप केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य राजू महाजन यांनी कलेचे महत्व विशद करून विविध कला एकत्र आल्यास मनाला आनंददायी ठरत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.राजश्री देशमुख यांनी तर आभार प्रकाशक काशिनाथ भारंबे यांनी मानले. कार्यक्रमानंतर कवी संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. उपस्थित कवींनी आपापल्या विविध विषयांवरच्या कविता सादर केल्या.