मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्या अरुण साधू यांची मराठी साहित्यातही होती अफाट मुशाफिरी
मुंबई । ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील शीव रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण साधू यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी झाले नाहीत. पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी आणल्यानंतर रुग्णालयाला दान करण्यात आले. मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली. ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या त्यांच्या कादंबर्यांवर आधारित ‘सिंहासन’ हा सिनेमाही आला. या सिनेमाने त्या काळात लोकप्रियतेचा शिखर गाठला. शिवाय आजही उत्कृष्ट सिनेमांपैकी एक म्हणून ‘सिंहासन’चं नाव घेतले जाते. पुणे विद्यापिठात पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून सहा वर्षे काम पाहिलेल्या साधू यांनी साम्यवादी क्रांतीवरही विशेष लिखान केले आहे. साम्यवादी क्रांतीची मराठी वाचकाला खरी आणि सर्वप्रथम ओळख ही साधू यांनीच करून दिली.
अरुण साधू यांची साहित्य संपदा
कादंबरी : शोधयात्रा, सिंहासन, झिपर्या तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत मुखवटा, मुंबई दिनांक विप्लवा, शापित, शुभमंग, स्फोट
कथासंग्रह : एक माणूस उडतो त्याची गोष्ट, ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्या इमारती, मंत्रजागर, मुक्ती
ललित : अक्षांश-रेखांशतिसरी क्रांतीसभापर्व
वैचारिक : ड्रॅगन जागा झाल्यावर, ‘फिडेल’चे आणि क्रांती
सहकारधुरीण (चरित्र), पडघम (नाटक)
८० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होते साधू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरील डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमांच्या लेखनाचे कामही अरुण साधू यांनी पार पाडले. १९६२ ते १९९० या काळात त्यांनी ‘केसरी’, ‘माणूस’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फ्री प्रेस जर्नल’ अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली. पत्रकारिता करत असतानाच त्यांनी स्वतंत्र लिखानालाही सुरूवात केली. पुणे विद्यापीठात १९९५ ते २००१ या काळात ते पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख होते. तिथे त्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले. साहित्यातील भरीव योगदानाची दखल घेत अरुण साधू यांची ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्कार आणि अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.
भाष्यकार गमावला – मुुख्यमंत्री
ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले. त्यांच्या कादंबर्या समकालिन राजकीय- सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवितात. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांची पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परखड, व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो
पत्रकारिता, साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एका परखड, व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत, विविधांगी स्वरुपाच्या लिखाणाने साधू यांनी पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. गेली ४० वर्ष सातत्याने समकालाचा वेध घेणारे लेखन अरुण साधू यांनी केले होते, त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे. – सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे