चिंचवडमध्ये रंगले बालकुमार साहित्य संमेलन
पिंपरी-चिंचवड : विद्यार्थी दशेत असतानाच मुलांवर योग्य संस्कार झाले पाहिजेत. विद्यार्थी दशेत संस्कार करण्यासाठी प्रभावी साहित्याची गरज असते. साहित्यातूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडतात, असे मत लक्ष फाउंडेशन पुणेच्या अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले. श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखा यांच्यावतीने ‘कविवर्य विं. दा. करंदीकर यांच्या जन्मशताब्दी’निमित्त चिंचवडमधील बालकुमार साहित्य संमेलन झाले.
बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रभुदेसाई बोलत होत्या. स्वागताध्यक्ष शिक्षणभूषण रामचंद्र जाधव होते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव देशमुख, उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह उद्धव कानडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त मोहन नगर ते श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवडपर्यंत बालकुमार दिंडी काढण्यात आली. जाऊ कवितेच्या गावा या कार्यक्रमात मुलांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये बालशाहीर आर्यन हंकारे, कवी दीपेश सुराणा यांनी सहभाग घेतला. यावेळी कवी भरत दौंडकर, राजेंद्र वाघ, संगीता झिंजुरके, अनिल दीक्षित आदी उपस्थित होते. महाराष्ट्राचा बालपुढारी म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दरवडे याने गोष्टींमधील गम्मत जम्मत या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.