केंद्रीय मंत्री हेगडे पुन्हा बरळले
बेळगावी : बुद्धिजीवी आणि साहित्यिक हे केवळ सरकारी लाभ मिळवण्यासाठी काम आणि कलांचे प्रदर्शन करतात, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. बेळगावी येथे स्किल्स ऑन व्हिल्स विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वी संविधान बदलण्याच्या वक्तव्यावर संसदेत त्यांना माफी मागावी लागली होती. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाहीत तोच हेगडे पुन्हा बरळले आहेत. दरम्यान, हेगडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी आहे. खासदार या नात्याने आपली वर्तणूक कशी असावी, काय बोलावे हे त्यांना समजायला हवे. ते बेजबाबदार व्यक्ती आहेत, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.
त्यांच्या लेखनाला अर्थ नसतो!
बेळगावी येथील कार्यक्रमात हेगडे म्हणाले, साहित्यिक जे काही लिहितात ते साहित्य बनते. त्यांच्या लेखनाला कोणतीही प्रासंगिकता किंवा अर्थ नसतो. फक्त सरकारी जमीन घेण्यासाठी ते असे करतात. हे तथाकथित बुद्धिजीवी मला मनुष्य होण्यास सांगतात. मी काय जनावर आहे का? मनुष्य जन्मानंतर आपले पुढील लक्ष्य हे देवतांसारखे होण्याचे असले पाहिजे. या सर्वांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यांनी अशी टिप्पणी करणे बंद केले पाहिजे.
ते सुधारतील, समजुतीने बोलतील!
हेगडे यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साहित्यक्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यापूर्वी आपल्या वक्तव्यामुळे संसदेसमोर माफी मागावी लागल्याचे हेगडे यांनी लक्षात ठेवायला हवे होते, असे लेखक के. एस. भागवन यांनी म्हटले. मला वाटले होते की, ते आता सुधारतील आणि समजुतीने बोलतील. कोणतेही साहित्य सरकारी भूखंड किंवा इतर लाभ घेण्यासाठी लिहिलेले नसते, असेही ते म्हणाले.