पर्यावरणपूरक बहुभाषिक कविसंमेलन संपन्न
निगडी : बोलण्यापेक्षा कृती जास्त महत्त्वाची असते. साहित्यिक हे समाज प्रबोधनातील महत्त्वाचे दुवे असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने सामान्य माणसांच्या समूहाने वाटचाल केली पाहिजे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी व्यक्त केले. होळी आणि धूळवडीचे औचित्य साधून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि हिंदी-उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक बहुभाषिक हास्य व विडंबन कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बाळा शिंदे बोलत होते. या प्रसंगी नगरसेविका शर्मिला बाबर, हिंदी आंदोलनाचे अध्यक्ष संजय भारद्वाज, हास्यकवी बंडा जोशी, कवयित्री मीनाक्षी भालेराव आदी उपस्थित होते.
बीना एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक हाजी इक्बालखान यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, माणूस विविध समस्यांमुळे हसणे विसरू नये म्हणून वेगवेगळ्या सणांचे आयोजन प्रत्येक धर्माच्या माध्यमातून केले जाते. आनंद निर्माण करणे हाच प्रत्येक सण-उत्सवाचा उद्देश असतो. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे संस्थापक राज अहेरराव यांनी आपल्या प्रास्ताविकातून मंडळाच्या पंचवीस वर्षे कालावधीतील उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच वातावरण निर्मितीसाठी ‘पावात काय आहे सांगतो तुम्हांला’ ही हास्यकविता सादर केली.
बंडा जोशी यांचे विडंबन
घातक रसायनांचा वापर करून बनवलेल्या कृत्रिम रंगांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. म्हणून फुलांची उधळण करीत सर्व उपस्थितांनी अनोख्या पद्धतीने कविसंमेलनाच्या उद्घाटनात सहभाग घेतला. हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषेतून गझल, नज्म, गीत, शेरो-शायरी, कविता, विडंबन अशा विविध प्रकारचे आकृतिबंध सादर करीत सुमारे पन्नास कवींनी ही बहुभाषिक काव्यमैफल उत्तरोत्तर अतिशय रंगतदार केली. याचा प्रारंभ ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी यांच्या ‘याडं लागलं रं याडं लागलं, मोबाईलचं पुरतं याडं लागलं’ या विडंबनाने झाला. भालचंद्र कोळपकर यांनी ‘नाच रे नवर्या बायकोच्या तालात’ हे विडंबनगीत सादर केले. अनिल दीक्षित यांच्या ‘जी एस टी’ या हास्यलावणीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संजय भारद्वाज यांच्या हिंदी काव्यरचनेने श्रोते अंतर्मुख झाले. मीनाक्षी भालेराव यांनी आपल्या अल्पाक्षरी उर्दू रचनांमधून समाजवास्तव मांडले. प्रतिभा श्रीवास्तव यांनी शृंगारिक गीत सादर केले.
शेख यांचे राजकीय विडंबन
जिया बागपती यांच्या उर्दू गझलेच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना प्रभावित केले. वर्षा बालगोपाल यांनी, लगीन मला करायचं नाही ही विनोदी कविता अतिशय तन्मयतेने सादर केली. तर मधुश्री ओव्हाळ यांनी नात्यातील विविध रंगांवर कवितेतून भाष्य केले. माधुरी विधाटे यांनी आपल्या काव्यातून भ्रष्टाचारी प्रवृत्तीवर कोरडे ओढले. आय.के. शेख यांनी राजकीय विडंबन सादर केले. संगीता जोशी यांची रचना पहाडी रागावर आधारित होती. अशोक कोठारी यांनी ‘बायकोची आरती’ म्हटली. प्रदीप गांधलीकर यांनी होळीवरची खुमासदार शेरो-शायरी सादर केली. ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी आणि शीलावती कांबळे यांनी मराठी, हिंदी होळीगीते गायली. तरन्नुमी गझल ‘जशी तशी फुलारतेस तू’ ही दिनेश भोसले यांची गझल आणि ‘ज्येष्ठांचे मनोगत’ ही नंदकुमार मुरडे यांची कविता श्रोत्यांना भावली. नंदकुमार कांबळे यांची ’सुगरण पत्नी’, रमेश वाकनीस यांची ‘खड्ड्यांची गझल’ , बी. एस. बनसोडे यांचे ‘माझ्या देशाच्या भूमीत’ हे विडंबन दाद मिळवून गेले. अंतरा देशपांडे यांची शेरो-शायरी, आनंद मुळक यांचे विनोद आणि बलभीम मोटे, पीतांबरे, सुधाकर सोनार यांच्या कविता उल्लेखनीय ठरल्या.
यावेळी मराठी भाषा संवर्धनाच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातल्या साहित्यिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आणि संबंधितांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. अरविंद वाडकर यांनी कार्यक्रमाचे तर अश्विनी कुलकर्णी यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी आभार मानले.