साहित्य परिषदेकडून दिल्ली विद्यापीठाच्या निषेधाचा ठराव

0

पुणे : अभ्यासक्रमातून मराठी भाषा वगळण्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या निर्णयाचा निषेध करणारा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनीच हा ठराव मांडला तो सभेने एकमताने मंजूर केला, अशी माहिती साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्व साधारण सभा परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, विश्वस्त उल्हासदादा पवार उपस्थित होते.

डॉ. कसबे म्हणाले, संस्कृती ही जेव्हा झिरपत तळापर्यंत जाते तेव्हाच तिचे उन्नयन होते. साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने शिवरातल्या माणसापर्यंत साहित्य चळवळ नेण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो स्तुत्य आहे. संस्था केवळ पैशांच्या बळावर पुढे जात नाहीत. चांगले काम आणि समाजाचे पाठबळ त्यासाठी आवश्यक असते. दिल्ली विद्यापीठाचा अभ्यासक्रमातून मराठी भाषा वगळण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. त्याचा या सभेत निषेध केला पाहिजे.