पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे देण्यात येणार्या वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार श्रेष्ठता पुरस्काराच्या निवडीत आता वाचकही सहभागी होणार आहेत. साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, पुरस्कार निवडीसाठी असा निर्णय घेणारी ही महाराष्ट्रातील पहिली साहित्य संस्था ठरल्याची माहिती साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. परिषदेच्या कार्यकारी मंडळाची सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह 32 सदस्य उपस्थित होते. या सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
प्रा. जोशी म्हणाले, प्रतिवर्षी चाळीस ग्रंथ आणि ग्रंथकारांना श्रेष्ठता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यामध्ये जीवनगौरव, भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार आणि ग्रंथकार पुरस्काराची निवड पदाधिकारी समिती करते. ग्रंथ पुरस्कारासाठी निवेदन देऊन ग्रंथ मागविले जातात. प्रत्येक वाड्मयप्रकारासाठी दोन तज्ज्ञ परीक्षक नेमले जातात. अनेक चांगली पुस्तके प्रकाशकांना आणि लेखकांना माहिती न मिळाल्यामुळे तसेच अनास्थेमुळे परिषदेकडे पाठवली जात नाहीत. चोखंदळ वाचकांनी चांगली पुस्तके वाचलेली असतात. ते अशा पुस्तकांची शिफारस परिषदेकडे या निर्णयामुळे करू शकतील आणि वाचकांनी सुचविलेल्या पुस्तकांचाही विचार करणे परीक्षकांसाठी बंधनकारक राहील. तसेच मसाप जीवनगौरव आणि भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासाठी वाचकांना नावे सुचविता येतील. पुरस्कार निवडीची प्रक्रिया पारदर्शी व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. परिषदेच्या आजवरच्या वाटचालीतला हा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे.
13 जिल्ह्यात होणार बालकुमार साहित्य संमेलने
साहित्य परिषदेने तिचे कार्यक्षेत्र असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये तेथील स्थानिक शाखा आणि शाळा यांच्या वतीने साधेपणाने बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा निर्णय घेतला आहे. बालकुमारांसाठीची साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी हे पाऊल उचले असून या निर्णयामुळे प्रतिवर्षी प्रत्येक जिल्ह्यात संमेलन होईल.
ग्रंथालयासाठी कार्यकारिणीचा पुढाकार
वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी परिषदेने ग्रंथ दत्तक योजनेचा प्रारंभ केला. याची सुरुवात कार्यकारी मंडळातील सदस्य एका ग्रंथाचा डिजिटायझेशनचा खर्च उचलून करणार आहेत. तर कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष हे तीन पदाधिकारी प्रत्येक दहा ग्रंथाच्या डिजिटायझेशनचा खर्च उचलणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात शिवार संमेलन
साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असणार्या सर्व जिल्ह्यांमध्ये साधेपणाने, कमी खर्चात होणारी शिवार साहित्य संमेलने घेण्यात येतील. तळागाळातील साहित्यप्रेमींना जोडण्यासाठी ही संमेलने निश्चितच उपयुक्त ठरतील.