साहित्य परिषदेला औंधच्या राजांचे नाव देण्याची मागणी

0

पुणे । साहित्य क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीला औंध संस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे नाव द्यावे, असा ठराव सातारा येथील कवी, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी परिषदेकडे सादर केला असून मधुसूदन पत्की यांनी त्यास अनुमोदन दिले आहे.

औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या स्वमालकीची 677.6 चौरस यार्ड एवढी जागा 81 वर्षापूर्वी रुपये 15 वार्षिक भाडेपट्याने काही वर्षांच्या कराराने परिषदेला दिली होती. त्यांनी दिलेल्या जागेवरच परिषदेची वास्तू उभी असल्याने आता औंधच्या राजांचे स्मरण करणे आवश्यक असून बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांची जयंती-पुण्यतीथी साजरी केली जावी आणि त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू केला जावा, असा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती वारुंजीकर यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा 21 ऑगस्ट रोजी होणार असून या सभेसाठी सभासदांकडून या विषयाबाबत सूचना व ठराव मागविण्यात आले आहेत. त्यानुसार हा ठराव कार्यकारणी समोर विचारार्थ ठेवण्यात आला आहे.