साहित्य पुरस्काराने दुधाळ, सोनवणे, गुरव यांचा गौरव

0

जळगाव । भवरलाल अ‍ॅन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे दिल्या जाणार्‍या साहित्य पुरस्कारांचे वितरण आज ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते झाले. कवयित्री बहिणाबाई पुरस्कार कल्पना दुधाळ (दौड, जि. पुणे), बालकवी ठोमरे पुरस्कार वाहरू सोनवणे (श्रीखेड जि. नंदुरबार) आणि कविवर्य ना.धों.महानोर पुरस्कार किरण गुरव (राधानगरी जि. कोल्हापूर) यांना आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कस्तुरबा सभागृहात संपन्न झालेल्या या शानदार सोहळ्याला जळगावातील रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कांताबाईंच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्ताने आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. नेमाडे यांनी धर्माच्या स्थित्यंतराची माहिती देत साहित्यिकांची जबाबदारी काय असली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करून त्यांनी भवरलाल जैन यांच्याविषयी अनुभव सांगितले, तर हातात मोबाईल असण्यापेक्षा हातात खुरप आणि गवताची पेंढी घेऊन शेती-मातीशी नात जोडणे केव्हाही चांगले, असे सांगून त्यांनी कल्पना दुधाळ, किरण गुरव आणि वाहरू सोनवणे यांच्या लेखन प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तिघा साहित्यिकांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, पद्मश्री ना.धों. महानोर, सेवादास दलूभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन यांच्यासह पुरस्कार प्राप्त कल्पना दुधाळ, जालिंदर दुधाळ, किरण गुरव, तेजस्विनी गुरव, वाहरु सोनवणे, हिरकणा सोनवणे हे उपस्थित होते. यावेळी तिघा साहित्यिकांवर तयार करण्यात आलेले माहितीपट दाखवण्यात आले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात संपन्न झालेल्या या शानदार सोहळ्यास जळगाव शहरातील रसिकांची उपस्थिती होती. या समारंभास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभा गणोरकर, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. विनया जोशी यांनी पसायदान सादर केले. श्रीपाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अनिल शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.