आपल्या साहित्यकृतींद्वारे अभिव्यक्त होणा-या कोणासही जाणकार वाचकांकडून मिळालेली दाद हा मोठा पुरस्कारच वाटत असतो. असे असले, तरीही साहित्यक्षेत्रातील कामगिरीचा गौरव करणारा कोणताही प्रत्यक्ष पुरस्कार त्या साहित्यकाराच्या चाहत्यांना मोलाचा वाटत असतो. असाच सर्वोच्च पुरस्कार डॉ. अरुणा ढेरे यांना ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रूपाने मिळाला आहे. हा क्षण त्यांच्यासह, त्यांच्या चाहत्यांना, तसेच मराठी साहित्य विश्वाला सुखावणारा आहे. साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये आपला अमीट ठसा उमटविणा-या अरुणा ढेरे त्यांच्या वाचकांना कायम प्रेमळ अरुणाताई वाटत आल्या आहेत.
यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमत होऊन अध्यक्षपदाची माळ डॉ. अरुणा ढेरे यांच्या गळ्यात पडली आहे. संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे (१९६१, ग्वाल्हेर), दुर्गा भागवत (१९७५, कराड), शांता शेळके (१९९६, आळंदी), विजया राजाध्यक्ष (२००१, इंदूर) या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भुषवू शकल्या आहेत. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडली आहे.
अशाप्रकारे संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला विराजमान होत आहे. महिला साहित्य व महिला साहित्यिक यांचा यामुळे सन्मान झाला आहे. तसेच आणखी एक गौरवाची बाब म्हणजे अध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवड झाली हा मोठा गौरव आहे. अध्यक्षपद निवडणुकीतील राजकारणामुळे या प्रक्रियेपासून व पर्यायाने पदापासून लांब राहणा-या साहित्यिकांमध्ये डॉ. अरुणा ढेरे यांचाही समावेश होता. यंदाही त्यांनी आपले नाव सुचविण्यासाठी सुरुवातीला फारचा उत्साह दाखविला नव्हता. मात्र महामंडळाच्या कार्यकारीणीतील 19 सदस्यांपैकी 12 जणांनी अरुणा ढेरे यांच्या बाजुने मते टाकली. गेल्या काही दशकांची अरुणाताई यांची कारकीर्द त्यांच्या पूर्वसूरींशी नाते सांगणारी आहे. कुसुमावती देशपांडे, शांता शेळके, इंदिरा संत यांचा वारसा एकविसाव्या शतकात नेणा-या अरुणाताईंवर पहिले संस्कार झाले, ते घरातूनच. विद्वान, व्यासंगी संशोधक, साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे हे त्यांचे पिता. पुस्तकांच्या सहवासातच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. वडिलांच्या मोठेपणाच्या छायेत त्यांच्यावरही संशोधनाचे संस्कार झाले. एखाद्या घटनेचे, जागेचे, व्यक्तीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व समजावून घेण्याची बालपणाची सवय त्यांना त्यांच्या लेखनातही उपयोगी ठरली. त्यांनी त्यांचे एमए, पीएचडीचे शिक्षण पुण्यातच घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या लेखनाची ओळख पुण्याबरोबर महाराष्ट्रालाही होऊ लागली होती. कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, समीक्षा अशा नाना तऱ्हेने त्यांनी लेखन केले. मात्र, त्यांना खरी आस कवितेची. तुझ्या डोळ्यांना आता, हवेत डोलणारे फुगेच फुगे रंगीबेरंगी अशी प्रतिके, नादबद्ध करणारे त्यांचे शब्द मनाच्या गाभ्याला खोलवर स्पर्श करून मोहरून टाकतात. अर्थात, समर्पणाची ओढ एक विलक्षण तगमग शांत करत हळूच पृच्छा करते, वाळून, गळून जाण्यातली सहजता कुठून येते जगण्यात? ही ओढ त्यांच्या अनेक कवितांतून दिसून येते. त्याच ओढीतून त्यांनी प्रेमातून प्रेमाकडे सारखे लेखन केले आहे. भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही, असे त्या म्हणतात. त्या जशा भाषेच्या प्रेमात आहेत, तशाच माणसांच्या जगण्याच्या. या जगण्याकडे त्या ममत्वाने पाहतात, म्हणूनच स्त्रीयांच्या जगण्याचे दुःख त्या आतून समजावून घेतात. त्यांच्या कथांमधून दिसणा-या, त्यांची नाती त्या जगण्याचे भान दाखवतात. त्यांच्या कलात्मक जाणिवेतून निर्माण झालेली त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरली, तशी समीक्षकांनीही नावाजली. पुरस्कारप्राप्त ठरली. विस्मृतीचित्रेसारखा ग्रंथ, जावे जन्माकडे किंवा अंधारातील दिवे, सारखे वैचारिक लेखन अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मात्र, या उदाहरणांपलीकडेही त्यांचे त्यांच्या वाचकांशी असलेले नाते कोणत्याही पुरस्काराएवढेच मोलाचे आहे. त्यांच्या वाचनप्रवासात स्त्रियांविषयीचे वाचन भरपूर झाले आहे. तर हिंदीमध्ये पुरुषोत्तम आगरवाल, हजारी प्रसाद, विजयनिवास मिश्र यांचे साहित्यदेखील त्यांनी खूप वाचन केले आहे. पाठ्य पुस्तकासोबत अवांतर वाचनामुळे ज्ञानात मोलाची भर पडली, असे त्या आवर्जून सांगतात. आपल्या वाचनाचा प्रवास एका दिशेने व्हावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. त्यामुळे त्याच काळात प्राचीन मराठी साहित्याचे सौंदर्य जाणून घेण्याठी वाचन सुरू झाले. माती, दगडं, विटा वापरून उभ्या केलेल्या भिंतींनी घराला आकार येतो. परंतु त्यांचे घर काहीसे वेगळे होते. घरामध्ये जशा विटा वापरून उभ्या केलेल्या भिंती होत्या, किंबहुना तशाच अगदी घराच्या छतापर्यंत पोहोचतील एवढ्या पुस्तकांच्या भिंती होत्या. त्यांचे वडील रा. चिं. ढेरे यांनी एकत्रित केलेला हा पुस्तकांचा संग्रह आजही त्यांच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेमाच्या घट्ट नात्यामध्ये बांधलेला आहे. प्रत्येक पुस्तकाचा वास काहीसा वेगळा असतो. मिळेल ते पुस्तक हातात घ्यायचे आणि आवडीने वाचायचे, असे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी शक्ती मिळते, ती वाचनातून. त्यामुळे वेगवेगळय़ा पुस्तकांतून विचारांचे धन गोळा करायचे आणि संगणकासमोर बसून की-बोर्डवर टाईप करण्यापेक्षा वही-पेन हातात घेऊन आपले विचार त्यावर मांडायचे, ही त्यांची आवड आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली. त्यांच्या वाड्यामध्ये शेवटच्या मजल्यावर महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे घर होते. त्यांचे घरही असेच, पुस्तकांनी भरलेले. चहूकडे जिथे नजर जाईल, तिथे पुस्तके दिसायची. त्यांच्या घरी त्या कधी गेल्या, तर माळयावर पुस्तके ठेवलेल्या ठिकाणी जात. एकीकडे त्यांच्या वाडय़ातील वाचनप्रेमी मंडळी आणि दुसरीकडे घरामध्ये असलेले अण्णांचे म्हणजे वडिलांचे पुस्तकांचे साम्राज्य, यामुळे पुस्तकांच्या विश्वात त्या रमून जायच्या. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान इंदिरा संत, कुसुमाग्रज यांच्या पुस्तकांचे वाचन अगदी कधीही, कुठेही होत असे. त्यांचे वाचनप्रेम जपले गेले, ते घरातील इतर सदस्यांमुळे. घरामध्ये मुलीने घरकाम करावे, अशी काहीशी धारणा असे. परंतु घरकामासोबतच वाचनही अग्रक्रमाने करावे, यासाठी घरातील इतरांनी त्यांना साथ दिली. त्यामुळेच त्यांचे वाचनाचे वेड जपले गेले. जसे चांगला लेखक होण्यासाठी वाचन आवश्यक असते. तसेच चांगला माणूस होण्यासाठी वाचन गरजेचे आहे. वाचनाने आपण केवळ स्वत:चे नाही, तर इतरांचेही आयुष्य जगत असतो. त्यामुळे माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी प्रत्येकाने वाचनशक्ती वाढवायला हवी, असा त्याचा संदेश आहे.