साहित्य महामंडळाच्या अंतर्गत गटबाजीनेच संमेलन राज्याबाहेर?

1

91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन यंदाही अगदीच नमनालाच वादग्रस्त ठरले. या संमेलनासाठी विदर्भातील विवेकानंद आश्रमाच्या प्रस्तावाची निवड अखिल भारतीय साहित्य महामंडळाने केली होती. ही निवड खरे तर प्रत्येक कसोटीवर सार्थच म्हणावी लागेल. यानिमित्ताने गावपातळीवर साहित्य संमेलन पोहोचणार होतेे. एकीकडे मराठी साहित्याने वैश्विक पातळी गाठली असताना ते पुरेशा प्रमाणात गावकुसात पोहोचले नव्हते. यानिमित्ताने ते अगदी खेड्यात पोहोचणार होते. संमेलन गावखेड्यात होत असल्याबद्दल अनेक साहित्यिकांनी सुरुवातीला नाके मुरडली; दरवर्षी पंचतारांकित सुविधांत साहित्याची आणि सर्वच प्रकारची मेजवाणी चाखणार्‍या सारस्वतांसाठी हा थोडा नाराजीचा विषय होता. परंतु, संमेलन आयोजक संस्थेकडे सर्वप्रकारच्या सुविधा आहेत, अगदी गावखेड्यात संमेलन असले तरी ते शहरी जीवनासारख्या उलटपक्षी निसर्गसंपन्न वातावरणात पार पडणार आहे, असे कळल्यानंतर आणि त्याची अनेकांनी खातरजमा केल्यानंतर सर्वच साहित्यिकांना आश्चर्याचा धक्का बसला; संमेलन तर चांगल्या ठिकाणी होत आहे, मराठी साहित्य गावकुसात नेण्यातही यश येत आहे. अशा दुहेरी उद्दिष्टसाध्यतेचा आनंद साहित्यिकांना मिळाला होता. एकीकडे असे सर्व चांगले वातावरण असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘राष्ट्रीय संघटक’ श्याम मानव यांनी अगदी अनपेक्षितपणे वाद उकरून काढला. साहित्य संमेलन म्हटले की वाद आलेच; आणि त्या वादांना प्रसिद्धी देण्यासाठी तर प्रसारमाध्यमांत अगदी चढाओढ लागलेली असते. त्यामुळे या वादात उडी घेऊन प्रसिद्धी मिळविण्याची संधी सोडतील ते श्याम मानव कसले? त्यांनी आपण 80च्या दशकांत विवेकानंद आश्रमाचे संस्थापक शुकदास महाराज यांच्यावर कशी टीका केली होती, कसे लेख लिहिले होते, त्यामुळे ते कसे भोंदू ठरतात, अशाप्रकारची ओरड करण्यास सुरुवात केली. साहित्य महामंडळाने संमेलनस्थळ बदलले नाही तर आपण आंदोलन करू, अशी धमकीही त्यांनी दिली.

प्रारंभी या सर्व वादात महामंडळ आणि श्याम मानव हे दोघे काय ते पाहून घेतील. मानवांच्या आरोपांना महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशीच उत्तर देतील, असे यजमान संस्था विवेकानंद आश्रमला वाटले. परंतु, या वादात श्रीपाद जोशी यांनी मौन पाळले. जोशी हे श्याम मानव यांचे जुने सहकारी, त्यामुळे या सर्व प्रकरणात त्यांची भूमिका ही अगदी ठरवून दिलेल्या सारखी वाटली. जोशींनी मौन पाळले, विवेकानंद आश्रमाकडूनही प्रतिवाद होत नाही, म्हणून श्याम मानव यांची जीभ बेछूट सुटली. त्यांनी शुकदास महाराजांची तुलना नुकतेच वादग्रस्त ठरलेल्या गुरुमीत रामरहीम यांच्याशी करुन आरोपांचा रोख स्वर्गीय शुकदास महाराजांकडे वळविला. महाराजांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन ते टीका करत आहेत, त्यांचे चारित्र्यहनन करत आहेत, हे पाहता विवेकानंद आश्रमाने आपले मौन सोडले. ज्या प्रकरणांचा श्याम मानव उल्लेख करत होते, आणि त्यावरून शुकदास महाराज व विवेकानंद आश्रम यांच्यावर टीका करत होते, त्या प्रकरणांचा निकाल 2001 मध्येच विवेकानंद आश्रमाच्या बाजूने लागलेला होता. न्यायालयाने श्याम मानव यांना शुकदास महाराज व आश्रमाची बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवून यापुढे कधीही बदनामी न करण्याची तंबी देत त्यांना मनाई हुकूम जारी केला होता. तेव्हा, मानवांचे आरोप हे सरळ सरळ कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे, अशा प्रकारचा इशारा विवेकानंद आश्रमाच्यावतीने सुरुवातीला पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला. परंतु, प्रसारमाध्यमांनी तोपर्यंत मानवांना डोक्यावर घेतले होते, वादही चांगलाच पेटला होता. परिणामी, अगदी सोप्या व साध्या शब्दांत आश्रमाने दिलेला हा इशारा श्याम मानव यांनी फारसा गांभिर्याने घेतला नाही. प्रसारमाध्यमांनी मानवांना जोर दिल्याने ते बेछूट बोलतच राहिले, अखेर विवेकानंद आश्रमाने मानवांना शिंगावरच घेण्याची तयारी करत तज्ज्ञ व आक्रमक वक्त्यांची प्रवक्ते म्हणून निवड करत, मानवांच्या बेछूट आरोपांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत या प्रवक्त्यांनी श्याम मानवांचे काढलेले वाभाडे, त्यांचा उघडकीस आणलेला खोटारडेपणा, ते करत असलेला न्यायालयाचा अवमान या बाबी जनतेसमोर सप्रमाण दाखवून दिल्या. त्यामुळे श्याम मानव यांना लगेच सत्य परिस्थितीची जाणिव झाली असावी, त्यामुळे त्यांनी आपली भूमिका सौम्य केली. परंतु, प्रसारमाध्यमांनी डोक्यावर घेतलेले असल्याने व माघार घेतली तर स्व-प्रतिमेचे काय? या द्विधेत मानव अडकून पडले असावेत. आता मागे आलो तर कार्यकर्ते काय म्हणतील? ही भीतीही त्यांना सतावत असावी. विवेकानंद आश्रमाने अत्यंत अभ्यासपूर्ण, काळजीपूर्वक व्यूहरचना करून श्याम मानवांना बरोबर कायदेशीर सापळ्यात अडकवले.

आश्रमाचे प्रवक्ते व श्याम मानव यांच्यात असे द्वंद सुरु असताना साहित्य महामंडळाने मात्र आपले मौन कायम ठेवले. आता मानव हे आपल्या कायदेशीर जाळ्यात अडकले आहेत, आणि यजमानावर हल्ले होत असताना साहित्य महामंडळाने किमान तठस्थ तरी भूमिका वटविणे व संमेलनस्थळाचे समर्थन करणे अपेक्षित असताना, त्यांनी तशी भूमिका घेतली नाही. त्यामुळे यजमान विवेकानंद आश्रम नाराज झाले. मानव अडकले आहेत, त्यांच्याकडे पाहू आणि संमेलनाच्या आयोजनातून अंग काढून घेऊ अशी अत्यंत चतुराईची भूमिका घेऊन विवेकानंद आश्रमाने वादामुळे आम्ही नाराज झालो आहोत. शुकदास महाराजांवरील आरोपांमुळे आमच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे, साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा शारीरिक सहभाग असेल; परंतु ते मनाने सहभागी नसतील. तसेच, संमेलन आयोजनात स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचा, विचाराचा प्रसार-प्रचार करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसेल तर आम्ही संमेलन आयोजनाचा प्रस्ताव मागे घेत आहोत, अशी भूमिका अगदी अचानकपणे जाहीर करून खळबळ उडवून दिली. एकूणच सर्व वादावर पडदा टाकला. आमच्या विरोधामुळे विवेकानंद आश्रमाने माघार घेतली असे म्हणण्याची सोयही आश्रमाने श्याम मानवांपुढे ठेवली नाही.

91 व्या साहित्य संमेलनासाठी एकूण तीन प्रस्ताव विचाराधीन झाले होते. त्यापैकी दिल्लीने माघार घेतली होती. बडोदा किंवा हिवरा आश्रम या दोनपैकी एका स्थळाची निवड साहित्य महामंडळाला करायची होती. या स्थळनिवडीवरूनही साहित्य महामंडळात दोन गट पडले. विदर्भ-मराठवाडा या दोन गटांनी स्थळनिवड मोठी प्रतिष्ठेची केली होती. त्यात मराठवाड्याच्या भूमिकेला डावलून संमेलन विदर्भातच घेण्यासाठी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जोरदार रणनीती आखली, ती कमालीची यशस्वी झाली आणि संमेलनासाठी विवेकानंद आश्रम या बुलडाण्यातील स्थळाची निवड झाली. मराठवाड्यातील गट हा बडोद्यासाठी आग्रही होता. आता विवेकानंद आश्रमाने आपला प्रस्ताव मागे घेतला असल्याने साहित्य संमेलन हे बडोदा येथे होणे क्रमप्राप्त ठरते. परंतु, एखाद्या राजकीय पक्षालाही लाजवेल, असे राजकारण सद्या साहित्य महामंडळात सुरु आहे. संमेलन विदर्भातच आणि त्यातही बुलडाणा जिल्ह्यातच घेण्यासाठी एक गट कामाला लागला आहे. त्यासाठी काही संस्थांच्या, राजकीय नेत्यांच्या, संस्थानिकांच्या आणि लक्ष्मीपतींच्या भेटीगाठी घेणे सुरु आहे. परंतु, यजमान होण्याची ‘तशी तयारी’ कुणीही दाखवत नाही. मराठवाड्यातील गटाच्या मनासारखे होऊ नये, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे.

खरे तर श्याम मानव व विवेकानंद आश्रमातील वाद काही नवीन नाही, गेली अडिच दशके हा वाद विदर्भाच्या भूमीत रंगतो आहे. मानव काही तरी आरोप करतात, त्याला आश्रमाची मंडळी कायदेशीर भाषेत उत्तर देतात. कधी जाहीरसभांद्वारे मानव शुकदास महाराजांवर टीका करतात, तर कधी प्रसारमाध्यमांना सामोरे जाऊन आश्रमाची मंडळी आपली भूमिका मांडतात व मानव यांना उत्तर देतात. त्यामुळे श्याम मानव यांनी विवेकानंद आश्रमाच्या संमेलनस्थळाला केलेला विरोध हा या दोघांचे वैयक्तिक भांडणच होते. संमेलन सुखरूप पार पडेपर्यंत श्याम मानव व विवेकानंद आश्रम या दोघांनीही शांत रहावे, एकदा हे संमेलन संपले की पुन्हा तुमच्या दोघांच्या भांडणाला खुशाल जोर येऊ द्यावा, अशी वडिलकीची, सामंजस्याची भूमिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतली असती आणि तिला जर राज्यातील साहित्यिकांनी पूर्ण ताकदीने समर्थन दर्शविले असते तर विरोध करणारे श्याम मानव एकटे पडले असते. यजमान विवेकानंद आश्रमही या मताशी सहमत झाले असते व त्यांनी संमेलन आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला नसता. परंतु, केवळ अंतर्गत गटबाजीने ही संधी महामंडळाने गमावली. बुलडाणा हे राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचा जिल्हा आहे. हिवरा आश्रम हा परिसर स्व. ना. घ. देशपांडे यांच्यासारख्या श्रेष्ठ कविवर्यांची कर्मभूमी-जन्मभूमी आहे. गेल्या अनेक दशकांपासून बुलडाण्यात साहित्य संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळे महामंडळ व साहित्यिकांनी जी बोटचेपी भूमिका घेतली, त्यामुळे आजरोजी साहित्य संमेलन राज्याबाहेर जात असल्याचे दुर्देवाने दिसते.

साहित्य संमेलन आणि वाद ही परंपरा तशी नवीन नाही. प्रत्येकवर्षी असे वाद निर्माण होतच असतात. परंतु, ते वाद साहित्याच्या समृद्धीसाठी पोषक ठरत असतात. यंदा जो वाद अगदी नमनालाच झाला; त्या वादातून हाशील तर काहीच झाले नाही; परंतु साहित्य महामंडळाची प्रतिमा मलिन झाली. साहित्यिकांची प्रतिमा मलिन झाली, साहित्यिक व महामंडळातील मतभेद, गटबाजी चव्हाट्यावर आली. दोघांच्या वैयक्तिक वादात साहित्य संमेलनाची वासलात लागली. आता नवीन आयोजक मिळाला तर ठीक अन्यथा बडोद्याला जाण्यासाठी साहित्यिकांना तयार रहावे लागणार आहे. श्याम मानवांना नडलेला प्रसिद्धीचा हव्यास, महामंडळाच्या अध्यक्षांचा ‘हटयोग’ आणि महामंडळातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण यामुळे हे साहित्य संमेलन वादात सापडले होते. त्यात शिक्षण, आरोग्य, कृषी, अध्यात्म आणि समाजसेवा या क्षेत्रात चांगले काम करणार्‍या एका व्रतस्थ संस्थेला नाहक बदनामीला सामोरे जावे लागले.

– पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे