पिढीजात कादंबरीचे प्रकाशन व नली एकलनाट्याचे सादरीकरण
जळगाव – श्रीकांत देशमुख यांचं साहित्य कविता, ललित आणि नुकतीच प्रकाशित झालेली पिढीजात हि कादंबरी वाचकाला अंतर्मुख करते. कारण शेती, कृषिसंस्कृती, नागरीकरण, आणि माणसाचं माणसापासून तुटलेपणाची जाणीव वाचकाला त्यांच्या साहित्यातून होते. म्हणूनच त्यांची पिढीजात ही कादंबरी मराठी साहित्यातील महत्वाची ठरू शकेल असं साहित्य यात आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या प्रायोगिक नाट्य चळवळीतील महत्वाचे केंद्र असलेल्या पुणे येथील प्रसिद्ध महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर्फे पुण्याबाहेरील सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम काम करणार्या संस्थेला ‘ऊर्जा’ उपक्रमांतर्गत सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येत. जळगावच्या परिवर्तन संस्थेला आमंत्रित करण्यात आले होते.
कादंबरीचे प्रकाशन
यानिमित्त साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पिढीजात कादंबरीचे प्रकाशन संजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष पाटील, लेखक श्रीकांत देशमुख, कोषाध्यक्षा सुनीता राजे पवार, राजहंस प्रकाशनाच्या वैशाली यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पिढीजात कादंबरीच्या प्रकाशनानंतर परिवर्तन निर्मित श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील यांच्या संकल्पनेतून, नाट्यरूपांतरित व योगेश पाटील दिग्दर्शित ‘नली’ एकलनाट्य प्रयोग हर्षल पाटील यांनी सादर केला. याप्रसंगी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सदस्य व दिग्दर्शक सचिन जोशी, डॉ. प्रतिमा जगताप व विश्वास जगताप, रजिता शिर्के यासोबत अनेक मान्यवर रसिक उपस्थित होते. ‘नली’ नाटकाचे पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी यांनी केले तर प्रकाश योजना योगेश पाटील, तंत्र साहाय्य अक्षय कोठावळे, नितीन वाघ यांचे होते. यशस्वीतेसाठी मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर, होरीसिंग राजपूत, अभिजित पाटील, मुकेश पवार, संदीप आदींनी परीश्रम घेतले.