चोपडा- येथील जेष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांची नुकतीच शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावार अशासकीय सदस्य म्हणून शासनातर्फे निवड करण्यात आली आहे. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ३५ सदस्यीय समिती येणाऱ्या काळात मराठी भाषेच्या साहित्यिक घडामोडी, नवलेखक अनुदान योजना, साहित्यिक शिबिर आयोजन मार्गदर्शन व भाषा संवर्धनासाठी कार्य करणार आहे. चोपडा येथील जेष्ठ साहित्यिक कवी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हा सदस्य, खानदेश साहित्य संघाचे शाखाध्यक्ष तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष असणारे अशोक नीलकंठ सोनवणे यांची विपुल साहित्य संपदा आहे. त्यांचे बाल कविता संग्रह, कथा संग्रह, प्रौढ़ कविता संग्रह प्रसिद्ध असून त्यांची ‘माय’ ही कविता महाराष्ट्रातील घराघरात पोहचली असून अनेक साहित्यिकांनी गौरवली आहे. अनेक दिवाळी अंक, नियतकालिकांमधुन तसेच वर्तमानपत्रातून ते सातत्याने लेखन करत असतात. त्यांच्या या निवडीमुळे चोपड्याचा सन्मान वाढला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.