हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तिंनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. या बदनामीमुळे ज्यांचे हात संमेलन यशस्वी होण्यासाठी राबणार होते, त्या हातांत नाराजीची तीव्र भावना निर्माण झाली आहे. अनेकांची मने दुखावली गेली आहेत. संमेलन हिवरा आश्रम येथेच घेतले तर ते हात राबतील; परंतु दुखावलेली मने कदापि सुखावणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा सहभाग केवळ शारीरिक राहील. असे असेल तर संमेलन आयोजनाचा हेतूच साध्य होणार नाही, यास्तव 91 वे साहित्य संमेलन विवेकानंद आश्रम येथे घेण्यासाठी आम्ही अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव आजरोजी मागे घेत आहोत, अशी महत्वपूर्ण घोषणा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष व भगवत्गीतेचे चिंतनकार आर. बी. तथा रतनलाल मालपाणी यांनी केली.
काय म्हणालेत विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष…
आपल्या छोटेखानी प्रसिद्धी नोटमध्ये आर. बी. मालपाणी यांनी नमूद केले, की मराठी साहित्य संमेलनाच्या 150 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात हे संमेलन होत आहे; याचा मनस्वी आनंद महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणसाला झालेला आहे. खेड्यापाड्यातील, वाडी-वस्त्यांतील मुलांच्या हातात पाटी-पुस्तक देण्याचे कार्य करणारे, दीन-दुःखीतांना हृदयाशी धरुन त्यांच्यावर उपचार करणारे, जातीपातीच्या भिंतीपाडून नवचैतन्याचे वारे पिऊन संकटाशी चार हात करण्याचे बळ देणारे विवेकानंद आश्रम हे समाजाचे ऊर्जाकेंद्र आहे. आम्ही ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या उद्दिष्टांशी सदैव एकनिष्ठ आहोत. माणसालाच देव मानणार्या या भूमीला पाहायला आपल्याला नक्कीच आवडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला हे सर्व पाहायला मिळणार होते; परंतु हे संमेलन कायम संस्थानिकांचेच बटिक असावे, अशी इच्छा असलेला एक वर्ग आहे; त्यांना विवेकानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद, धर्मनिष्ठा आणि आश्रमाची त्याग, सेवा, समर्पणाची संस्कृती संमेलनाच्या आयोजनस्थळात अडचण ठरत आहे. त्या शक्तींना अधिक खटाटोप करण्यासाठी संस्थेवर खोटेनाटे घाणेरडे आरोप करावे लागत असतील व त्यातून आश्रमाच्या कार्याशी जोडलेल्या लाखो संवेदनशील स्त्री-पुरुषांची मने दुखवली जात असतील, व त्यांचा संमेलनातील सहभाग केवळ शारीरिक राहणार असेल तर संमेलनाचा ÷उद्देशच सफल होऊ शकत नाही. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल तर आणखी ताणून धरण्यात काय हाशील आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले.
दरवर्षी विवेकानंद विचार साहित्य संमेलन घेणार
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा त्याग केल्यानंतर विवेक विचारांचा प्रचार करणारे वादातीत असलेले विवेकानंद विचार साहित्य संमेलन स्वतंत्रपणे विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही आयोजित करणारच आहोत, अशी महत्वपूर्ण घोषणाही आर. बी. मालपाणी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संमेलनस्थळ निवडीच्या आडून विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष तथा मानवहितकारी संत पूज्यनीय शुकदास महाराज यांच्यावर चारित्र्यहनन करणारे आरोप चालविले होते. तसेच, संमेलन इतरत्र घ्यावे, अशी मागणी केली होती. या मागणीवरून साहित्यिकांतही दोन गट निर्माण झाले होते. श्याम मानव व त्यांच्या सहकार्यांच्या आरोपांना विवेकानंद आश्रमाच्यावतीने सहसचिव तथा मुख्य प्रवक्ते संतोष गोरे, सहप्रवक्ते पुरुषोत्तम सांगळे, आत्मानंद थोरहाते यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. श्याम मानव यांनी पूज्यनीय शुकदास महाराज यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेधही करण्यात येत होता. मानवांवर कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला निवेदनेही देण्यात आली होती.
आता तरी वाद थांबवावेत!
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्याम मानव व त्यांचे सहकारी करत असलेले आरोप, या आरोपांना तेवढ्याच ताकदीने विवेकानंद आश्रमाचे प्रवक्ते देत असलेले प्रत्युत्तर आणि त्यात काही साहित्यिकांचे निर्माण झालेले दोन गट व त्यांच्याकडून येणारी वक्तव्ये यामुळे युगप्रर्वतक स्वामी विवेकानंद यांचीच प्रतिमा खराब होत आहे, तेव्हा विवेकानंद आश्रमानेच हे संमेलन नाकारावे, असा सल्ला 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दिला होता. शिवाय, संमेलनस्थळाची घोषणा केली तरी तसे अधिकृत पत्र देण्यात साहित्य महामंडळाकडून टाळाटाळ सुरु होती. दुसरीकडे, श्याम मानव व त्यांचे सहकारी पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवित होते. अशा त्रिशंकु परिस्थितीत विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीत तब्बल सहा तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या बैठकीत हे संमेलनच नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर बाहेर आलेल्या अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी अक्षरशः आता तरी वाद थांबवावेत, असे हताश उद्गार काढलेत.