बुलढाणा। शुकदास महाराजांमुळे ख्यातकीर्त विवेकानंद आश्रमाला 91 वे साहित्य संमेलनाचे आयोजकत्व मिळावे, यासाठी विश्वस्त मंडळाने साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आश्रमाची पाहणी केली हे साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याबाबत काही संस्था सक्रीय आहेत. दिल्लीतील मराठी राजकारणीदेखील दिल्लीलाच संमेलनासाठी आग्रही आहेत. त्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन हिवरा आश्रम की नवी दिल्ली येथे घ्यावे, असा प्रश्न साहित्य महामंडळाला पडला आहे.
महामंडळ अध्यक्षांकडून पाहणी
बुलडाणा जिल्हा हा मराठवाडा, खान्देश व विदर्भाला जोडणारा सेतु असून विदर्भाचे प्रवेशद्वार आहे. कविवर्य ना. घ. देशपांडे, राजमाता जिजाऊ मॉसाहेब, संत चोखामेळा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत गजानन महाराज, संत शुकदास महाराजांसारखे नररत्न या जिल्ह्याने दिलेले आहेत. यापूर्वी कधीही साहित्य संमेलन या जिल्ह्यात झालेले नाही. ही संधी 91व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्याला लाभावी, यासाठी विवेकानंद आश्रमाने साहित्य महामंडळाकडे रितसर प्रस्ताव दाखल केला आहे. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक शुकदास महाराज स्वतः दार्शनिक व साहित्यिक होते. अनुभूति ही अभंगगाथा आणि मालकी नसलेली बोधवचने हा दार्शनिक ग्रंथ त्यांनी समाजाला दिला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी नुकतीच विवेकानंद आश्रमास भेट देऊन पाहणी केली लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीसाठी मराठी नेत्यांचा दबाव!
विवेकानंद आश्रमातर्फे दरवर्षी विवेकानंद जन्मोत्सव साजरा केला जातो. साडेतीन लाख भाविक हजेरी लावतात. त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचा विवेकानंद आश्रमास दीर्घ अनुभव आहे. दोन हजार साहित्यिकांसह साहित्यरसिकांच्या निवास, भोजनाची व्यवस्था आश्रमाकडे असून, पाच हजार लोक बसतील असे विचारपीठ, सुविधा आणि तीन हजार स्वयंसेवकांची फळीदेखील आहे. तथापि, दिल्ली येथेच साहित्य संमेलन घेण्यासाठी राजधानीतील मराठी नेत्यांचा राजकीय दबाव पाहाता, दिल्ली की हिवरा आश्रम? असा पेच साहित्य महामंडळाला पडलेला आहे.