‘साहित्य संस्कृती’तर्फे ‘पत्रलेखन’ स्पर्धा

0

हडपसर । संपर्क व दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेल्या विशेष प्रगतीमुळे कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त पत्रलेखन संस्कृतीचा झपाट्याने र्‍हास झालेला अनुभवास येत आहे. ही पत्र संस्कृती जपली जावी, त्याबाबत नव्या पिढीमध्ये आकर्षण निर्माण व्हावे, आपल्या भावना त्यातून व्यक्त करता याव्यात यासाठी येथील ‘हडपसर साहित्य संस्कृती मंडळाने’ विद्यार्थी व नागरिकांसाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली. लोहिया उद्यानात आयोजित केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चार गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सुमारे 135 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. 5 ते 7 या गटासाठी ‘गावची जत्रा’ व ‘मला आवडलेले पुस्तक’, 8 वी ते 10 वी या गटासाठी ‘आपल्या जीवनातील मोबाईलचे महत्त्व’ व ‘आपल्या देशातील विज्ञानातील गगनभरारी,’ महाविद्यालयीन गटासाठी ‘जात माझा दृष्टिकोन’ व ‘मतदानाचे महत्त्व’ तर खुल्या गटासाठी ‘देदिप्यमान यश प्राप्त केलेल्या पाल्यास पत्र’ व ‘समाज सेवेची सुरुवात घरातून’ आदी विषयांवर सहभागी स्पर्धकांनी आपल्या प्रिय व्यक्तीस पत्रलेखन केले.

विविध संस्थांचा सहभाग
यावेळी सुधीर मेथेकर, कृष्णकांत कोबल, नगरसेवक चेतन तुपे, योगेश ससाणे, शिवाजी पवार, प्रा. विजय कुलकर्णी, साहित्यिक जयंत हापन, संतोष जगताप, विवेक ससाणे उपस्थित होते. संस्कार विश्‍व, सह्याद्री प्रतिष्ठान, सिद्धेश्‍वर बहुउद्देशीय संस्था, शिवसमर्थ संस्था, मानवी संस्था आदींनी स्पर्धेचे संयोजन केले.

उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी
पत्रांमधून डोकवणारे नात्यातील बंध, जिव्हाळा, गोडवा आणि दटावणी नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करणारी आहे. उत्कृष्ट साहित्य निर्मितीलाही येथे मोठा वाव होता. याशिवाय संगणक, मोबाइलच्या सहवासाने पत्रलेखन कालबाह्य किंवा दुर्लक्षित होऊ नये, यासाठी दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित केली जात आहे.
– सुधीर मेथेकर
अध्यक्ष, हडपसर साहित्य संस्कृती मंडळ