महाराष्ट्रात ‘जाणता राजा’, तर देश पातळीवर ‘चाणक्य’ म्हणून ख्यात असणारे शरद पवार साहेब यांनी त्यांचे परममित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काढलेले चिमटे दोन घटकाभर मनोरंजन करणारे नक्कीच आहेत. मात्र, मुळातच अनेक वेळा मोदींसोबत गळ्यात गळे घातल्यानंतर त्यांना टोले हाणणारे साहेब पाहून लवकरच निवडणुका तर नाहीत ना? ही मनातली शंका तपासून पाहणे आवश्यक आहे. यातूनच साहेब आगामी निवडणुकांची पूर्वतयारी करत असल्याचे पाहून त्यांच्याविषयी या कौतुकात अंमळ भर पडलीच आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील एका कार्यक्रमात शरदराव पवार यांनी अतिशय मिश्किलपणे घेतलेले चिमटे हे वृत्तवाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूज अथवा वर्तमानपत्रीय मथळ्यांपुरते मर्यादित नक्कीच नाहीत. कारण आपले साहेब कधीही व्यर्थ बोलत नाहीत. किंबहुना समर्पक बोलण्यासाठी जर एखादे पारितोषिक असते तर त्याचे पहिले मानकरी तेच राहिले असते यात आमच्या मनात जराही संशय नाही. आणि हो…बोलण्यावरून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण अवचितपणे आल्याशिवाय राहत नाही. अर्थात पवार आणि मोदी यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमध्ये काही साम्यस्थळे असली तरी बरीच विसंगतीही आहे. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यापासून ते आजवर कायम ‘इलेक्शन मोड’मध्ये असतात. यामुळे त्यांचे संसदेतील भाषण कोणते आणि देश-विदेशांतील जाहीर कार्यक्रम कोणते यात आपल्याला भेद करता येत नाही, तर शरदराव पवार यांच्याकडे ‘मॅन्युअल’ आणि ‘इलेक्शन’ या दोन मोडमध्ये शिताफीने बदल करण्यासाठी एक अफलातून गीअर आहे. याचा विचार करता आधी मोदींवर निवडणुकीच्या काळात तुटून पडणारे पवार हे विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकालही जाहीर होत नाही तोच भाजपला विनाशर्त पाठिंबा देऊन सहजपणे मोकळे होतात. नंतर अनेकदा गळ्यात गळे टाकतात तर अधूनमधून चिमटे घेण्याचे काम करतात. दुसरीकडे पवार यांच्याप्रमाणेच राजकारणातील विविध कावेबाज चालींना कोळून प्यायलेले नरेंद्र मोदी हेदेखील तितकेच मुरब्बी आहेत. यामुळे निवडणुकीत चाचा-भतीजाच्या कथित भ्रष्टपणावर जोरदारपणे टीकास्त्र तोडणारे मोदी हे जाहीरपणे शरद पवार हे आपले मार्गदर्शक असल्याचे सांगतात तेव्हा सर्वसामान्य जनतेला तोंडात बोट घालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतोच. याच सोईस्कर खरं तर संधीसाधू ‘लव्ह-हेट’ रिलेशनशिपला ‘राजकारण’ म्हणत असल्याने पुढे बोलणार तरी काय? याच राजकीय ‘फिक्सिंग’मुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील पडद्याआडची अभद्र हातमिळवणीदेखील वारंवार अधोरेखित होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही योगायोग हे सर्वसामन्यांना अचंबित करणारे ठरले आहेत. शिवसेना व भाजपची तब्बल पाव शतकांपासून असणारी राजकीय मैत्री तुटल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याची झालेली घोषणा ही याच पद्धतीच्या चमत्कारिक योगायोगाचा भाग मानली गेली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या सुमारे सव्वा दोन वर्षांत यातील अनेक कंगोरे आपल्यासमोर उलगडले आहेत. खरं तर शिवसेनेच्या मुजोरीला धडा शिकवण्यासाठी भाजपला नामी संधी असून, याचा पुरेपूर उपयोग केला जात आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने पाठिंबा काढण्याचा दगाफटका केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची रसद हातच्याला असावी, अशी ‘व्यवस्था’ करण्यात आली आहे. अर्थात हा समझोता वाटतो तितका एकमार्गी नक्कीच नाही. याच्या बदल्यात पवार साहेबांनी बरेच काही पदरात पाडून घेतले आहे. यामुळे शिवसेना नेतृत्वाचा वारंवार उपमर्द करत, त्यांच्या मंत्र्यांना दुय्यम स्थान देत खिजवणारे भाजप नेते दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नरमाईचे धोरण स्वीकारत असल्याचे आपल्याला दिसून येते. यापेक्षाही पुढील बाब म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जेटलींसारखे ज्येष्ठ सहकारीदेखील कायम शरदराव पवार यांच्या महत्तेचे गोडवे गातात.
मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध हे एखाद्या ‘नुरा कुस्ती’समान बेगडी वाटू नये याची दक्षता घेणे आवश्यक असते. यातूनच वेळ पाहून टोले, चिमटे, कोपरखळ्या आदींचा मुक्त वापर करणे आलेच. याचाच एक अध्याय पवारांच्या पिंपळगावातील भाषणातून आला आहे. खरं तर नोटाबंदीवरून राहूल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांनी पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला असताना पवार यांनी आजवर फारशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. नाही म्हणायला आपल्याला एटीएममधून पैसे मिळण्यात अडचणी आल्या अथवा एकदा नाष्ट्याचे बिल देण्यासाठी सुटे पैसे मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. आता मात्र आपल्या ताज्या भाषणातून नोटाबंदीवरून ते आक्रमक होण्याचे संकेत आहेत. खरं तर नोटाबंदीच्या 50 दिवसांच्या कोलाहलपूर्ण वातावरणात जनतेच्या आक्रोशाचा राजकीय उपयोग करून घेण्याची नामी संधी राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच गमावली आहे. नाही म्हणायला 9 जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असले तरी हा साप निघून गेल्यानंतर भुई थोपटण्याचा प्रकार आहे. मात्र, तोंडावर येऊन ठेपलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांसाठी अजेंडा ठरवण्याचा आणि खरं तर ‘इलेक्शन’ मोडवर शिफ्ट होण्यासाठी हे आवश्यक असल्याचे पवार साहेब जाणून आहेत. यामुळे आपल्या अनुयायांना रस्त्यावर उतरण्याचे निर्देश देताना त्यांनी पद्धतशीरपणे वातावरण तापवण्याचे काम केले आहे. यामुळे साहेबांनी पंतप्रधान मोदी याच्यावर वक्रोक्तीने ते ‘लय हुशार’ असल्याची स्तुतिसुमने उधळली, तरी ते स्वत:देखील याचे मानकरी नक्कीच आहेत.