सा.बां.विभागाच्या कामांसाठी चांगल्या कंत्राटदाराची निवड करा

0

जळगाव । राज्य शासनाच्या सर्व कर्मचार्‍यांना सातव्या आयोगामध्ये भरपूर पगार वाढ होणार आहे. त्यात प्रमाणात त्यांनी कामे करावी. कर्मचार्‍यांना यात कोणत्याही प्रकारचा भष्ट्राचार करू नये. तसेच प्रत्येक विभागाची प्रतिमा ही त्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांवर अवलंबुन असते. विभागामार्फत कामे करण्यासाठी चांगला कंत्राटदार निवडला तरच तो चांगले व दर्जेदार काम होईल. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे देतांना चांगल्या कंत्राटदाराची निवड करा, असा सल्ला सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिला.

या कामांची आहेत अंदाजित रक्कम
न्युटी अंतर्गत जिल्ह्यात 405 किलोमीटरची कामे लवकरच सुरु होणार असून या कामांची अंदाजित किंमत 947.52 कोटी रुपये आहे. यामध्ये मुसळीफाटा धरणगाव अमळनेर बेटावद रस्ता लांबी 61.00 कि.मी., अंदाजित किंमत 136.92 कोटी रुपये, राज्यसिमा विटवा भुसावळ जामनेर मोताळा पिंपळगाव राजा खामगाव रस्ता, लांबी 45 कि. मी., अंदाजित किंमत 102.48 कोटी, चोपडा खेडी भोकर अमोदा कानळदा जळगाव पाचोरा वाडी सातगाव भराडी रस्ता, लांबी 51 कि. मी. अंदाजित किंमत 115.92 कोटी, भिकनराव पाल खिरोदा सावदा आमोदा रस्ता, लांबी 44 कि. मी., अंदाजीत किंमत 99.12 कोटी, येवला नांदगाव चाळीसगाव भडगाव रस्ता, लांबी 108 कि. मी. अंदाजित किंमत 246.12 कोटी, चांदवड मनमाड चाळीसगाव नागद अजिंठा रस्ता, मेहेरगाव धुळे अमळनेर चोपडा रस्ता, लांबी 34.76 कि. मी. अंदाजित किंमत 74.76 कोटी, सावखेडाफाटा धरणगाव एरंडोल म्हसावद नेरी जामनेर, लांबी 41 कि. मी. अंदाजित किंमत 97.44 कोटी, हरीपुरा यावल बोरावल टाकरखेडा शेळगाव कळगाव भादली आसोदा रस्ता, लांबी 20 कि. मी., अंदाजित किंमत 74.76 कोटी रुपये या कामांचा समावेश आहे. या कामांचे वाहतुक सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून लवकरच पुढील आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर योजनातंर्गत रस्ते व पुल, इमारतीचे बांधकाम, इमारतींची व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, इमारती, रस्ते व पुलांच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आढावा घेण्यात आला.