सिंगत शिवारात पिंप्रीसेकमच्या 40 वर्षीय इसमाचा निर्घृण खून

मध्यरात्रीची घटना : निंभोरा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा : संशयीतांची चौकशी

भुसावळ : रावेर तालुक्यातील सिंगत शिवारातील आंदलवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर भुसावळ तालुक्यातील 40 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कैलास भिका पाटील (40, पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा
पिंप्रीसेकम येथील कैलास भिका पाटील या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळीसिंगत शिवारातील आंदलवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर आढळल्याची माहिती कळताच फैजपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, निंभोर्‍याचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ व सहकार्‍यांनी धाव घेतली. अज्ञात आरोपींने कैलास पाटील यांचा खून करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला शिवाय ओळख न पटण्यासाठी त्यांच्या चेहर्‍यावर दगड टाकल्याची बाब समोर आली आहे. मयताची आई प्रमिलाबाई भिका पाटील (पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास हवालदार विकास कोल्हे व सुरेश अढांयगे करीत आहे. दरम्यान, खुनाच्या अनुषंगाने काही संशयीतांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.