मागणीसाठी शेतकर्याचा गळफास ; प्रशासनाची धावपळ
भुसावळ- तालुक्यातील वेल्हाळे येथे निलगाईंचा उपद्रव टाळण्यासाठी सिंगल फेज पुरवठा करण्याची मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी सोमवारी सकाळी गळफास घेण्याच्या पावित्र्यात झाडावर चढले. या घटनेनंतर प्रशासनाची भंबेरी उडाली व सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच तातडीने घरगुती वापराचे वीज मीटर लावून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनाने उडाली खळबळ
वेल्हाळे भागातील जंगलात दुष्काळामुळे निलगाई व अन्य वन्य प्राण्यांची खाद्यासाठी भटकंती होत असल्याने या प्राण्यांकडून बागायती क्षेत्रावरील कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने हा उपद्रव टाळण्यासाठी महावितरण कंपनीने वेल्हाळे भागातील शेती शिवाराला सिंगल फेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली होती तसेच सोमवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतली गेल्याने परीसरातील शेतकरी योगेश पाटील, अशोक शिंदे, दिनेश पाटील, देवा पाटील, संतोष पाटील, सोपान पाटील, संदीप चौधरी, निलेश येवले, शुभम येवले, छबीलदास पाटील यांच्यासह 60 ते 70 शेतकरी 695 शिवारातील शेतात एकत्र आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश पाटील यांनी गळ्यामध्ये फास घेऊन आत्महत्येसाठी झाडावरती चढताच वीज कंपनीच्या अधिकार्यांनी शेतकर्यांशी संपर्क साधला व आपणाला भेट देत असल्याचे सांगितले. वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आर.आर.घोरूडे, उपकार्यकारी अभियंता अजय वराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर फिड कृषी वाहिनीचे असल्याने याठिकाणी सिंगल फेज सुरू करता येत नसल्याची सबब सांगण्यात आली शिवाय वरीष्ठ स्तरावरून सिंगल फेज योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले शिवाय तोपर्यंत घरगुती वापराचे वीज मीटर घेऊन या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करता येऊ शकत असल्याचा पर्याय दिल्याने तूर्त आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, जळगाव येथील सहाय्यक वनरक्षक सी.आर.कांबळे व मुक्ताईनगर येथील बच्छाव यांनी सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी 24 तासाच्या आत पंचनामे करून वरीष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल तसेच जंगलाचे मोजमाप करून याठिकाणी संपन्न करण्याचा प्रस्ताव देखील वरिष्ठ पातळीवरील पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.