सिंगापूर ओपनवर ‘साई’राज

0

सिंगापूर । सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का देत बी.साईप्रणिथने विजेतेपदावर कब्जा केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत श्रीकांतला मात देत प्रणिथने विजय साकार केला. दोघेही भारतीय बॅडमिंटनपटू आमनेसामने आल्याने खास ठरलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साईप्रणिथने श्रीकांतवर 17-21, 21-17, 21-12 अशी मात केली. बी.साईप्रणिथने याआधी श्रीकांतला 4 वेळा पराभूत केले होते, तर केवळ एकदा पराभव पत्करला होता. सिंगापूर ओपन सुपर सिरीजमध्ये विजय मिळवत प्रणिथने श्रीकांतचा पाचव्यांदा पराभव केला.

लढत झाली अटीतटीची
दोन्ही भारतीय खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने ही लढत अटीतटीची झाली. चुरशीच्या झालेल्या पहिल्या गेममध्ये किदम्बी श्रीकांतने साईप्रणिथची झुंज 21-17 अशा फरकाने मोडून काढत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसर्‍या गेममध्येही दोन्ही बॅडमिंटनपटूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. एक-एक पॉईंट मिळण्यासाठी साईप्रणिथ आणि श्रीकांत एकमेकांची परीक्षा घेत होते. दरम्यान श्रीकांतने घेतलेली मोठी आघाडी मोडून काढत साईप्रणिथने सामन्यात पुनरागमन केले. अखेर या गेममध्ये साईप्रणिथ वरचढ ठरला आणि त्याने श्रीकांतला 21-17 अशी मात दिली. त्यानंतर तिसर्‍या गेममध्ये साईप्रणिथने श्रीकांतवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याने गेमच्या पूर्वार्धातच श्रीकांवर 11-5 अशी आघाडी घेतली.

एकाच देशाचे खेळाडू चौथ्यांदा फायनलमध्ये : भारतीय बॅडमिंटनमधील ’स्टार’ खेळाडू स्पर्धेबाहेर पडलेले असताना नवोदित साई प्रणित आणि श्रीकांत किदम्बी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सिंगापूर ओपनमध्ये अंतिम फेरी गाठलेले दोन्ही खेळाडू एकाच देशाचे असण्याची ही चौथी वेळ होती. यापूर्वी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्कच्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. साई प्रणीत आणि किदम्बी श्रीकांतने शनिवारी सरळ गेम्समध्ये प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत सिंगापूर ओपन सुपरसिरीजच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. श्रीकांतने इंडोनेशियाच्या अँथॉनी सिनिसुका गिटिंगवर 21-13, 21-14 असा सफाईदार विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते तर बी. साई प्रणिथने अंतिम फेरीत डोंग कुन लीचा 21-6, 21-8 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

प्रणिथ दुसरा भारतीय खेळाडू
सिंगापूर ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत यंदा दोन्ही खेळाडू भारतीय होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंनी खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. मोठी आघाडी असल्याचा फायदा श्रीकांतला झाला आणि त्याने पहिला गेम 21-17 असा खिशात घातला. दुसर्‍या आणि तिसर्‍या गेममध्ये प्रणिथ अनुक्रमे 1-8 आणि 1-6 असा पिछाडीवर होता. मात्र यानंतर प्रणिथने जोरदार मुसंडी मारली. श्रीकांतने आघाडी घेतली असली, तरी प्रणिथचा प्रतिकार जबरदस्त होता. त्यामुळे पहिला गेम गमावून आणि दुसर्‍या आणि तिसर्‍या गेममध्ये पिछाडीवर असूनही प्रणिथने जोरदार कामगिरी केली. प्रणिथ सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी श्रीकांतने सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे.