सिंगापूर बंदरातील कॅप्टनसह परप्रांतीयांना काढून टाका !

0

उरण (अजित पाटील) : स्थानिकांच्या नोकरभरतीतला अडथळा असलेल्या सिंगापूर पोर्टमधील कॅप्टन मृत्युंजय धवल यांच्यासह प्रकल्पातील परप्रांतीय 40 कामगारांना काढून टाका अन्यथा कंपनीचे पुढील कोणतेही कामकाज चालवू न देण्याचा इशारा उरणमध्ये कार्यरत असलेल्या सेना – भाजपा वगळून सर्वपक्षीय नोकरी व व्यवसाय बचाव समितीने दिला आहे. यासंदर्भातील इंग्रजी भाषेतील एक पत्र थेट सिंगापूर येथे बसणारे कंपनीचे विभागीय व्यवस्थापक ची फुग वाँन यांना ईमेल द्वारे पाठविले आहे. या पत्रावर माजी आमदार विवेक पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेसचे नेते श्याम म्हात्रे व महेंद्र घरत, मनसेचे अतुल भगत आणि कम्युनिस्ट पक्षाचे भूषण पाटील आदींच्या या सह्या आहेत.

जेएनपीटीचे अध्यक्षांचा आदेशही मानला जात नाही?
जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्यासोबत यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमधून डिग्गीकर यांनी सिगापूर पोर्टचे संचालक सुरेश अमिराप्पो आणि दादा जगताप यांना प्रकल्प ग्रस्ताच्या नेत्यांसमोर स्पष्ट शब्दात त्या परप्रांतीय 40 कामगारांना आणि कॅप्टन मृत्युंजय धवल यांना कंपनीने त्वरित काढून या वादावर पडदा टाकावा, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतरही व्यवस्थापनाने संबंधित 40 परप्रांतीय कामगारांवर कॅप्टन मृत्युंजय धवल यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या पार्श्वभूमीवर अखेर समितीने बंदराचे सिगापूर येथील वरिष्ठ ची फुग वाँन यांनाच मेल करून शेवटचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे सिगापूर पोर्ट विरोधातील स्थानिकांचा लढा आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

कॅप्टन धवल यांची प्रकल्पग्रस्तविरोधी भूमिका
उरणच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून कॅप्टन मृत्युंजय धवल यांनी आपल्या गावाकडील सुमारे 40 परप्रांतीयांना जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात म्हणजेच पीएसए बंदरात भरती केली आहे त्याचबरोबर पीएसए बंदरात सध्या कार्यरत असलेले कॅप्टन धवल हे पूर्वी पासून प्रकल्पग्रस्तांचे विरोधक आहेत. यापूर्वी त्यांनी नोकरभरती करतांना अर्थपूर्ण सेटींग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सर्वात पहिले त्या जागेवरून हाकलून द्यावे अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी सुरुवाती पासून लावून धरली आहे. याबाबत जेएनपीटी अध्यक्षांकडे ही लेखी तक्रार यापूर्वीच करण्यात आली आहे.

नोकरभरतीतही स्थानिकांना डावलले जात असल्याचा आरोप
उरणमध्ये उभ्या राहिलेल्या जेएनपीटी बंदरासाठी येथील नागरिकांचा फार मोठा त्याग आहे. यातूनच घरटी एक नोकरी देण्याचे बंदर उभारणीच्या वेळी देण्यात आले होते त्याची पूर्तता मागील 30 वर्षात झालेलीच नाही. जेएनपीटीच्या विस्तारीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जीटीआय आणि डीपी वर्ल्ड नावाची आणखी दोन बंदरे उभी राहिली, या ठिकाणच्या नोकरभरतीतही स्थानिकांना मोठ्या प्रमाणात डावलण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.