अवैध वाहतूकरदारांवर कारवाईचा बडगा तर अवैध धंद्यांवर संक्रांत
भुसावळ: भुसावळातील सिंघम अर्थात सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल हे एक महिना प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधीत असलीतरी चोरून-लपून अवैधधंदे चालकांनी डोके काढले होते तर अवैध वाहतुकीला ऊत आला होता मात्र दोन दिवसांपूर्वीच शहरात दाखल झालेल्या खर्या खर्या सिंघम असलेल्या नीलोत्पल यांनी अधिकार्यांची मॅरेथॉन बैठक घेत कारवाईचे निर्देश दिले अन यंत्रणा अलर्ट झाली. 7 रोजी एकाच दिवसात तब्बल मोटार व्हेईकलच्या 271 तर अवैध वाहतूकदारांवर 14 केसेस दाखल करण्यात आल्या तसेच सार्वजनिकरीत्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या 16 केसेस करण्यात आल्या. जनतेने या कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत करीत नियमित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
वाहतूक शाखा अलर्ट ; नियम पाळा अन्यथा दंड भरा
भुसावळच्या वाहतूक शाखेत काही महिन्यांपूर्वीच रूजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनीही आपल्या कार्य कुशलतेने बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी निरीक्षकपदाचा त्यांच्याकडे पदभार असतानाच त्यांनी चेन स्नॅचिंग टोळीसह शहर हद्दीत चोर्या करणार्या पाच चोरट्यांना बंदीस्त करीत मुद्देमालाची रिकव्हरी केल्याने त्यांच्या धडक कारवाईचेही भुसावळकरांनी स्वागत केले आहे. बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे हे देखील धडक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत तर तालुका हद्दीतही निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी कारवाईसाठी कंबर कसली आहे.