अजित पवार, तटकरे यांच्या अडचणी वाढल्या
नागपूर : काँग्रेसच्या जनआक्रोश आणि राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची नागपुरात मंगळवारी सांगता झाली. दुसरीकडे, सरकारकडून सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने एकूण चार एफआयआर दाखल केले. धक्कादायक बाब म्हणजे, तत्कालीन जलसंपदामंत्र्यांनी घोटाळ्याच्या फाईलींवर सह्या केल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवारांना क्लीनचिट नाही!
गोसेखुर्द प्रकल्पासंदर्भात झालेल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी हे एफआयआर दाखल करण्यात आले. दरम्यान, एसीबीने या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट दिलेली नाही, असे उत्तर एसीबीने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला दिले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती. गृहखात्याच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखलची कारवाई केली. तत्कालिन अभियंते, विभागीय लेखा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात हे गुन्हे नोंदवण्यात आलेत. मोखाबर्डी उपसा सिंचन, गोसीखुर्द डावा कालवा, वडाला शाखा कालवा आणि गोसीखुर्द उजवा कालवा या चार सिंचन प्रकल्पांच्या कामात अनियमितता, भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामे केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.-