लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सहा गुन्हे दाखल केले. गोसेखुर्द प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहते. विदर्भातील सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणातील एकूण गुन्ह्यांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.
आरोपींमध्ये अधिकारी, कंत्राटदार
गोसेखुर्द प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत नागपूरमधील एसीबीकडून तपास सुरु असून मंगळवारी पोलिसांनी 6 गुन्हे दाखल केले. गोसेखुर्द प्रकल्पातील उजव्या कालव्यातील बांधकाम, अंभोरा उपसा सिंचन योजनेच्या वितरिकेवरील जलसेतुचे व लादीमोरीचे मातीकाम, घोडाझरी शाखा कालवा, मोखाबर्डी उपसा सिंचन मुख्य कालवा या कामांमधील भ्रष्टाचाराबाबत सहा गुन्हे दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये तत्कालीन अभियंते, विभागीय लेखाधिकारी, कंत्राटदार यांचा समावेश आहे. भारतीय दंड विधानातील कलम 420, 468, 471 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.