बोदवड । अनुदानाअभावी बोदवड येथील सिंचन विहीरींचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे 40 लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्याकडे यासंदर्भात समस्या मांडली. रोजगार हमी योजनेअंतर्गत बोदवड येथे 2015 – 2016 मध्ये सिंचन विहिरींचे काम मंजूर झाले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या या कामात केवळ 10 टक्के विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत विहिरींचे अनुदान न मिळाल्याने काम अपूर्ण आहे.
32 लाभार्थ्यांना 10 हजार रुपयांचे मिळाले अनुदान
विहिरीसाठी अनुदान मंजूर असलेल्या 32 लाभार्थ्यांना सुरूवातीला 10 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. तर विहीर 50 फूट खोल झाल्यानंतर लाभार्थ्यांना दोन लाख 70 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार होते. मात्र, मध्यंतरी बोदवड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने लाभार्थ्यांचे अनुदान रखडले आहे. या कामासाठी पंचायत समितीने 22 लाखांच्या निधीची मागणी नोंदवली आहे.\
पावसाळ्यापूर्वीच व्हावीत कामे
येथील लाभार्थ्यांना अनुदानाच्या निधीअभावी विहिरींचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे बहुतांश शेतामधील कामे हि बंद असून सध्या उन्हाळा चालू होऊन पावसाळा सुरु होण्यापूर्वीच हि कामे पुर्ण होण्याची आवश्यकता आहे.
पाठपुरावा करण्याची गरज
तालुक्यात या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकर्यांनी आपला प्रस्ताव सादर केला होता. मात्र या योजनेला ब्रेक मिळाल्यामुळे तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने देखील हालचाली सुरु केल्या असून पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा होईल. तसेच शासनाकडून याप्रकरणी खुलासा मागवला जाणार असल्याचे समजते. मात्र प्रशासकीय कारभार हा नेहमीच दिरंगाईने चालत असल्यामुळे याचा फटका शेतकर्यांना बसत आहे.